प्राणिसंग्रहालयाच्या कामास खोडा
By Admin | Updated: May 11, 2016 00:32 IST2016-05-11T00:32:32+5:302016-05-11T00:32:32+5:30
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाका लावला आहे

प्राणिसंग्रहालयाच्या कामास खोडा
पिंपरी : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाका लावला आहे. शनिवारी दहा विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन होणार आहे. मात्र, संभाजीनगर येथे होणाऱ्या प्राणिसंग्रहालय नूतनीकरणाच्या कामास भाजपाने आक्षेप घेतल्याने चौकशीचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या कामास खोडा घातला गेला आहे. उद्घाटनाचे काय होणार, याबाबत चर्चा आहे.
दिनेश वाघमारे यांनी महापालिका आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रशासनास शिस्त लावण्यास सुरुवात केली आहे. समाविष्ट गावांतील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी ठिय्या आंदोलन केले. संभाजीनगर येथील बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयाचे नूतनीकरण करण्याचे काम सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम यांच्या हट्टासाठी केले जात आहे. त्यावर कोट्यवधींची उधळण केली जात आहे, असा आक्षेप भाजपाने घेतला आहे. त्यामुळे आयुक्तांनी शहर अभियंता यांना या कामांची चौकशी करावी. तोपर्यंत वर्कआॅर्डर थांबवावी, असे तोंडी आदेश दिले. दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने येत्या शनिवारी होणाऱ्या विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन समारंभाची पत्रिका तयार केली आहे. त्यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या हस्ते सकाळी पावणेअकराला प्रभाग क्रमांक नऊ संभाजीनगरमधील प्राणिसंग्रहालयाच्या नूतनीकरण कामाचा शुभारंभ होणार आहे.
संभाजीनगरच्या कामांची वर्कआॅर्डर आयुक्तांनी थांबविली असताना दुसरीकडे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रशासनाने याच कामाचे भूमिपूजनही आयोजित केले आहे. त्यामुळे हे उद्घाटन होणार का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सत्ताधारी आणि प्रशासनात या मुद्द्यावरून जुंपली आहे. (प्रतिनिधी)या प्रकरणी आयुक्तांनी चौकशी करावी. ते माहिती घेऊन निर्णय देतील. एकदाही नगरसेवक न झालेल्यांनी उपद्व्याप करू नयेत. नागरिक सुज्ञ आहेत. मानसिक संतुलन बिघडल्याने आरोप केले जात आहेत. आम्ही चुकीचे काम करणार नाही.
- मंगला कदम, सत्तारूढ पक्षनेत्या