सहलीसाठी गेलेल्या दोन ग्रामपंचायत सदस्यांचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:11 IST2021-02-09T04:11:41+5:302021-02-09T04:11:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क राजगुरुनगर: शस्त्राचा धाक दाखवून फिल्मी स्टाईलने दोन नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचे अपहरण केल्याची घटना राजगुरुनगर येथील खेड ...

Kidnapping of two Gram Panchayat members who went on a trip | सहलीसाठी गेलेल्या दोन ग्रामपंचायत सदस्यांचे अपहरण

सहलीसाठी गेलेल्या दोन ग्रामपंचायत सदस्यांचे अपहरण

लोकमत न्यूज नेटवर्क

राजगुरुनगर: शस्त्राचा धाक दाखवून फिल्मी स्टाईलने दोन नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचे अपहरण केल्याची घटना राजगुरुनगर येथील खेड घाटात घडली आहे. याबाबत विठ्ठल भाऊसाहेब कवाद (रा. निघोज, ता. पारनेर, जि. अहमदनगर) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पारनेर तालुक्यातील निघोज गावातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य राजकीय सहलीसाठी गेले होते. रविवारी (दि. ७) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास जेवण्यासाठी खेड घाटाच्या वरती माळेगाव (ता. खेड) येथील पुणे-नाशिक महामार्गालगत एका हॉटेलमध्ये थांबले होते. दरम्यान, सदस्य आणि काही गावकरी ओतूर येथे देवदर्शनासाठी जात असताना सचिन मच्छिंद्र वराळ, मंगेश सखाराम वराळ, सुनील मच्छिंद्र वराळ, नीलेश राजू घोडे, अजय संजय वराळ, राहुल भाऊसाहेब वराळ, स्वप्निल भाऊसाहेब दुनगुले, सुभाष आनंदा वराळ, आकाश विजय वराळ, धोंडीभाऊ जाधव हे सर्व (रा. निघोज, ता. पारनेर, जि. अहमदनगर) व इतर १५ते २० जणांनी ग्रामपंचायत सरपंचपदाच्या कारणावरून फिर्यादी विठ्ठल कवाद यांना काठीने मारहाण केली. शिवीगाळ व धमकी देऊन तलवारीची व लोखंडी रॉडचा धाक दाखवून दिगंबर भागाजी लाळगे, आणि गणेश दत्तू कवाद या दोन नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना बळजबरीने मोटारीत घातले. फिर्यादी कवाद यांचा मोबाईल हिसकावून जमिनीवर आपटून तोडला आणि दोन्ही सदस्यांना घेऊन फरार झाले. या प्रकरणी निघोज गावातील २५ जणांवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास खेड पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरिक्षक भारत भोसले करत आहे.

Web Title: Kidnapping of two Gram Panchayat members who went on a trip