इंदापूर : सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक धनंजय वाशिंबेकर यांच्यावर आज (दि. २४) रात्री सव्वाआठच्या सुमारास शहरातील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बाबा चौकात प्राणघातक हल्ला करण्यात आला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना वाचविण्यासाठी त्यांच्या अंगावर पडलेले त्यांचे कार्यकर्ते महावीर लोंढेदेखील जखमी झाले आहेत. प्राथमिक उपचारानंतर वाशिंबेकर यांना तातडीने अकलुजला हलविण्यात आले आहे. त्यांचे सहकारी लोंढे यांना अकलूज येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे.नगरसेवक धनंजय वाशिंबेकर ८ वाजण्याच्या सुमारास कांबळे गल्लीतील कावडीची आरती करून कार्यकर्त्यांशी बोलत, बाबा चौकात त्यांनी उभ्या केलेल्या त्यांच्या दुचाकीकडे निघाले असता अचानक आलेल्या चार अज्ञात युवकांनी हातातील सत्तुरांनी, वाशिंबेकर यांच्या चेहऱ्यावर सपासप वार केले. त्यांना वाचविण्यासाठी त्यांच्या अंगावर पडलेल्या महावीर लोंढे याच्या पाठीवरदेखील सत्तुराचे वार झाले आहेत. त्याची करंगळी तुटली आहे. अवघ्या ५ ते १० मिनिटांत हे नाट्य घडले. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. वाशिंबेकरांना रिक्षामध्ये टाकून, उपजिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना अकलूजला पाठविण्यात आले. वाशिंबेकर यांच्यावर सन २००६ च्या सुरुवातीला सरडेवाडी (ता. इंदापूर) येथे हल्ला झाला होता. त्यातून ते वाचले होते. हा दुसरा हल्ला आहे. (वार्ताहर)घटनास्थळी सत्तूर बाबा चौकात रक्ताचे थारोळे साठले होते. तिथेच चपलांचा एक जोड व सत्तूर पडलेला होता. वाशिंबेकरांवर हल्ला झाल्याचे वृत्त कळताच उपजिल्हा शासकीय रुग्णालयात लोकांची प्रचंड गर्दी झाली होती. कार्यकर्ते, समर्थक आक्रमक झाले होते. मात्र, पोलिसांनी आक्रमक जमावाला शांत केले.
नगरसेवक वाशिंबेकर यांच्यावर खुनीहल्ला
By admin | Updated: March 24, 2015 23:15 IST