खेड शिवापूर टोलनाक्यावर बनावट पावतीचे रॅकेट पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:15 IST2021-02-26T04:15:07+5:302021-02-26T04:15:07+5:30
भोर : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील खेड शिवापूर येथील टोलनाक्यावर बनावट पावत्या देऊन वाहनचालकांची आर्थिक लूट होत असल्याचे समोर आले ...

खेड शिवापूर टोलनाक्यावर बनावट पावतीचे रॅकेट पकडले
भोर : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील खेड शिवापूर येथील टोलनाक्यावर बनावट पावत्या देऊन वाहनचालकांची आर्थिक लूट होत असल्याचे समोर आले आहे. याबाबत एका नागरिकाने स्थानिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. पोलिसांनी टोलनाक्यावर स्टिंग ऑपरेशन करुन टोलवरील बनावट पावतीची सत्यता बाहेर आणून रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
याबाबत राजगड पोलीस ठाण्यात सात कर्मचाऱ्यांसह इतरांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे टोल नाक्याचा भोंगळ कारभार समोर आला आहे. खेड शिवापूर टोलनाक्यावरील बनावट पावती देऊन नागरिकांना लुटणाऱ्या टोळीबाबत अभिजित वसंत बाबर (रा. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. खेड शिवापूर टोलनाक्यावर बनावट पावत्या देऊन वाहनचालकांची लूट करून फसवणूक केल्याप्रकरणी सुदेश प्रकाश गंगावणे (वय २५, रा. वी. धोम कॉलनी, ता. वाई), अक्षय तानाजी सणस (वय २२, रा. नागेवाडी, ता. वाई, सातारा), शुभम सीताराम डोलारे (वय १९, रा. जनता वसाहत, पुणे), साई लादुराम सुतार (वय २५, रा. दत्तनगर, कात्रज), हेमंत भाटे, दादा दळवी व सतीश मरगजे (पूर्ण नाव व पत्ता नाही) व इतर टोलवरील कर्मचाऱ्यांवर राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
याबाबतची महिती अशी की अभिजित बाबर हे पुण्यातून स्वतःच्या चारचाकी वाहनातून सातारा या मूळ गावी दि. १६ व २० फेब्रुवारी रोजी खेड शिवापूर टोलनाक्यावर १९० आणि आनेवाडी टोलनाक्यावर १३० रुपयांचा जाताना व परत येताना टोल कर्मचाऱ्यांनी पावती दोन्ही वेळी दिली होती. अनेक वाहनचालकांना अशाच प्रकारे पावती देऊन वाहने सोडली जात होती. यावेळी बाबर यांना खेड शिवापूर व आनेवाडी टोलवरील पावतीच्या साईजबाबत संशय आल्याने त्यांनी फसवणुकीबाबत पुणे ग्रामीणचे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना याबाबत तक्रार केली होती. सदरची शहानिशा करण्यासाठी दि.२४ बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास खेड शिवापूर व आनेवाडी टोलनाक्यावर स्टिंग ऑपरेशन करण्यासाठी दोन पथके गुन्हे शाखेने रवाना केली होती. राजगड ठाण्याचे उपनिरीक्षक निखिल मगदूम तपास करत आहेत.
-----------
खेड शिवापूर टोलनाका हा भ्रष्टाचाराने माखलेला असून याची चौकशी केली तर प्रंचड घोटाळे बाहेर येतील. यासाठी खेड शिवापूर टोलनाक्याचे ऑडिट होणे गरजेचे आहे.
ज्ञानेश्वर दारवटकर, कृती समिती निमंत्रक