‘खरीप’ संकटात!
By Admin | Updated: July 14, 2014 05:07 IST2014-07-14T05:07:26+5:302014-07-14T05:07:26+5:30
पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील खरीप हंगाम संकटात असून, ४० टक्के भात रोपवाटिका संकटात सापडल्या आहेत.

‘खरीप’ संकटात!
पुणे : पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील खरीप हंगाम संकटात असून, ४० टक्के भात रोपवाटिका संकटात सापडल्या आहेत. तर पुरंदर, बारामती, इंदापूर, शिरूर व दौंडमध्ये येत्या आठवडाभरात समाधानकारक पाऊस न झाल्यास तेथील शेतकऱ्यांना खरिपाचा हंगाम कोरडा घालवावा लागणार आहे. त्याऐवजी त्यांनी थेट रब्बी पिके घ्यावीत, असा सल्ला कृषी विभागातर्फे देण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या टंचाई बैठकीत जिल्ह्यातील कृषी परिस्थितीचादेखील आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात ११ जुलैअखेर केवळ दोन टक्के पेरण्या झालेल्या असून, खरिपाची स्थिती बिकट असल्याचे सांगण्यात आले.
या पार्श्वभूमीवर, जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानेश्वर बोटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘जिल्ह्यात भाताचे ६० हजार हेक्टर क्षेत्र असून, त्यासाठी साडेपाच हजार हेक्टरवर भात रोपवाटिका तयार केल्या जातात. पावसाने ओढ दिल्याने त्यातील ४० टक्के भात रोपवाटिका बाधित झाल्या असून, त्यातील २५ ते ३० टक्के वाटिका उद्ध्वस्त झाल्या आहेत. गेले काही दिवस होत असलेल्या रिमझिम पावसामुळे काही वाटिकांना जीवदान मिळाले आहे.’’
पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जलस्रोत असलेल्या ठिकाणी शेतकरी गटांनी एकत्र येऊन भात रोपवाटिका केल्यास त्यांना बियाणे, खतांसाठी ४८ हजार रुपये हेक्टरी अनुदान देण्यात येईल. तसेच, रोपांचा कालावधी कमी होण्यासाठी रहू पद्धतीने वाटिका करावी.
बियाणे २४ तास पाण्यात भिजत ठेवून, नंतर ते भिजलेल्या गोणपाटात दोन दिवस ठेवावे. कोंब आलेले बियाणे वाटिकेच्या ताफ्यावर टाकल्यास त्याचा फायदा होतो. पेरणी लांबल्याने एकाऐवजी तीन ते चार रोपांची पेरणी करावी लागेल. मात्र, पाऊस लांबल्यास १५ ते २० जुलैदरम्यान डोंगरमाथ्यावरील जमिनीत भाताऐवजी नाचणी घ्यावी. भोर, वेल्हे, मावळ, मुळशी, तसेच खेड व आंबेगावच्या काही भागांत ही पद्धत वापरावी, असा सल्ला बोटे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)