खरीप वाया जाऊनही नाही दुष्काळ !
By Admin | Updated: December 29, 2014 00:36 IST2014-12-29T00:32:15+5:302014-12-29T00:36:48+5:30
संपूर्ण खरीप हंगाम वाया जाऊनसुद्धा खेड तालुक्यात दुष्काळ नसल्याचा साक्षात्कार प्रशासनाला झाला असून, पीकपाहणीनंतर एकाही गावाची आणेवारी ५० पैशाच्या खाली नसल्याचे शासनाला आढळले आहे.

खरीप वाया जाऊनही नाही दुष्काळ !
राजगुरुनगर : संपूर्ण खरीप हंगाम वाया जाऊनसुद्धा खेड तालुक्यात दुष्काळ नसल्याचा साक्षात्कार प्रशासनाला झाला असून, पीकपाहणीनंतर एकाही गावाची आणेवारी ५० पैशाच्या खाली नसल्याचे शासनाला आढळले आहे.
यावर्षी तालुक्यात खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. मुळात पाऊस सुरूव्हायला जुलै महिन्याचा मध्य उजाडला होता. पावसाची मृग आणि आर्द्रा ही दोन्ही नक्षत्रे कोरडी गेली होती. त्यामुळे बाजरी, भुईमूग या पिकांच्या पेरण्या खूप कमी प्रमाणात शेतकऱ्यांनी केल्या.
कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार तालुक्यात खरिपाचे ४८५५७ हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे. त्यापैकी अवघ्या २७१५८ हेक्टरवर पेरणी झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी लक्ष्मण होटकर यांनी दिली. बाजरीचे सरासरी क्षेत्र ४२१० हेक्टर एवढे मुळातच घटले आहे. त्यापैकी केवळ ८१७ हेक्टरवर म्हणजे १९ टक्केच पेरणी यावर्षी झाली. भुईमूग पिकाचे क्षेत्र ११०८१ हेक्टर आहे. त्यापैकी केवळ ४७०५ हेक्टरवर म्हणजे ४२ टक्के पेरणी झाली. तूर, मूग, उडीद, मटकी, चवळी, घेवडा, वाल, पावटा, हुलगा या खरीप कडधान्यांच्याही पेरण्या फक्त ५३ टक्के झाल्या. बटाटा अवघा ५५ टक्के लावला गेला. बाजरी, भुईमूग, बटाटा, कडधान्ये ही खरिपाची प्रमुख पिकांची पेरच मुळात निम्मी झाली.
त्यानंतर पावसाची अनियमितता, उशिरा पेर आणि हंगाम चक्र बिघडल्याने उत्पादन घटूनही शासनाला आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी दिसली नाही, हे नवलच झाले.