बुधवारपासून खरीप, टंचाई आढावा बैठक
By Admin | Updated: May 10, 2016 00:52 IST2016-05-10T00:52:10+5:302016-05-10T00:52:10+5:30
गेल्या वर्षीच्या हंगामात पावसाने दगा दिल्याने खरीप व रब्बी पिकांना फटका बसला असला, तरी या वर्षी चांगल्या पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली असून

बुधवारपासून खरीप, टंचाई आढावा बैठक
पुणे : गेल्या वर्षीच्या हंगामात पावसाने दगा दिल्याने खरीप व रब्बी पिकांना फटका बसला असला, तरी या वर्षी चांगल्या पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली असून, २ लाख २६ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावर खरिपाचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. या पार्श्वभूमीवर, बुधवारपासून जिल्हा परिषद तालुक्यानुसार खरीप हंगाम आढवा बैठका घेणार आहे.
आज जिल्ह्यात १०६ टँकर सुरू असून, जनावरांच्या चाऱ्याचीही कमतरता भासू लागली आहे. यामुळे पाणी व चारा टंचाईचा आढवाही घेण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी सांगितले.
या वर्षी चांगले पर्जन्यमान होण्याचा आंदाज वेधशाळेने वर्तवला असून, कृषी विभागाने खरिपातील महत्त्वाचे भातपिकाचे ६० हजार ३००, ज्वारी ३२००, बाजरी ५० हजार २००, मका १९ हजार असे खरीप तृणधान्यांचे १ लाख ४१ हजार १०० हेक्टरवर, कडधान्याचे ३८ हजार ७७० तर गळीतधान्यांचे ४६ हजार ५०० असे २ लाख २६ हजार ३०० हेक्टरवर नियोजन केले आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे ११ मे ते २० मे असे १० दिवस तालुक्यानुसार आढावा बैैठका घेण्यात येणार आहेत. नियोजनाचे सादरीकरण करण्यात येईल.
या बैठका जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद व कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या सभापती सारिका इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून मंत्री, खासदार, आमदार, विषय समिती सभापती, पंचायत समिती सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आदी उपस्थित राहणार आहेत.