‘खंडू’च्या आवाजाने टळला सर्पदंशाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:11 IST2021-05-25T04:11:50+5:302021-05-25T04:11:50+5:30

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘तो’ सर्वच विद्यार्थ्यांचा लाडका आहे. दरवर्षी विद्यार्थी न चुकता त्याचा वाढदिवस साजरा करतात. ...

Khandu's voice averted the danger of snake bites | ‘खंडू’च्या आवाजाने टळला सर्पदंशाचा धोका

‘खंडू’च्या आवाजाने टळला सर्पदंशाचा धोका

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘तो’ सर्वच विद्यार्थ्यांचा लाडका आहे. दरवर्षी विद्यार्थी न चुकता त्याचा वाढदिवस साजरा करतात. कारण तो ‘प्रामाणिक’ आणि ‘धाडसी’ आहे. आजपर्यंत दोनदा त्याने सर्पदंशापासून एका सुरक्षारक्षकाचे आणि दुसऱ्यांदा विद्यार्थ्यांचे प्राण वाचविले आहेत. दुसरी घटना सोमवारी घडली आहे. ही गोष्ट आहे विद्यापीठातल्या खंडू नावाच्या कुत्र्याची.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात सोमवारी (दि.२४ ) काही विद्यार्थी एकत्र चर्चा करत बसले होते. त्याचवेळी तिथे खंडू अचानक जोरजोरात भुंकू लागला. तरीदेखील विद्यार्थ्यांचे त्याकडे लक्ष नव्हते. मात्र, कुत्र्याचे भुंकणे थांबत नाहीये म्हणून त्यांना काहीतरी धोका असल्याची जाणीव झाली. जागेवरून उठून त्यांनी आजूबाजूला पाहिले तर एक भला मोठा साप त्यांच्या अगदी जवळ आलेला दिसला. काही क्षणात तिथून ते बाजूला झाले. कुत्र्याने भुंकणे चालूच ठेवल्याने नंतर सापाने आपला मार्ग बदलला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी लगेच सर्पमित्रांना बोलावले. काही वेळातच सर्पमित्रांनी या सापाला ताब्यात घेतले. ‘खंडू’ने अलर्ट केल्यामुळे सर्पदंशाचा धोका टळला. अगदी काही क्षणांचाही विलंब किती महागात पडला असता तर या विद्यार्थ्यांना सापाने दंश केला असता.

काही महिन्यांपूर्वी असेच विद्यापीठ परिसरात काही सुरक्षारक्षक एकत्र जेवण करत बसले होते. जेवताना गप्पात रंगलेल्या सुरक्षारक्षकांना पुढील धोक्याची कल्पना देखील नव्हती; पण तिथेच असलेल्या खंडूने हा धोका ओळखला होता. साप जवळ अगदी काही फुटांवर येऊन ठेपला होता. सुरक्षारक्षकाच्या हाताला दंश करणार एवढ्यात खंडू कुत्र्याने सापावर झडप घालण्यासाठी उडी मारली, पण ती सुरक्षारक्षकाच्या अंगावर पडली. त्यामुळे खडबडून जाग्या झालेल्या सुरक्षारक्षकाला जवळचा साप दिसला. नंतर सर्पमित्रांनी या सापाला पकडले होते.

------------------

लॉकडाऊन काळात विद्यापीठात विद्यार्थ्यांची गर्दी कमी आहे. शैक्षणिक कामकाजदेखील बंद असल्याने वर्गदेखील बंद आहेत. या कालावधीत बऱ्याचदा साप आढळतात. मात्र, खंडूमुळे दोन वेळा दोघांचे प्राण वाचविल्याची चर्चा विद्यापीठात सुरू आहे.

- अविनाश शेंबटवाड, विद्यार्थी

--------------

Web Title: Khandu's voice averted the danger of snake bites