जेजुरीत मानाच्या शिखरी काठ्याची खंडोबा देव भेट; दोन लाखांवर भाविकांनी घेतले कुलदैवताचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 12:36 PM2024-02-26T12:36:03+5:302024-02-26T12:36:20+5:30

धार्मिक रूढी परंपरांचे जतन करीत यात्रा पार पाडावी, असे ठरले होते. त्याच पद्धतीने सोहळा पार पडला...

Khandoba God gift of Mana peak stick in Jejuri; Over two lakh devotees took darshan of the deity | जेजुरीत मानाच्या शिखरी काठ्याची खंडोबा देव भेट; दोन लाखांवर भाविकांनी घेतले कुलदैवताचे दर्शन

जेजुरीत मानाच्या शिखरी काठ्याची खंडोबा देव भेट; दोन लाखांवर भाविकांनी घेतले कुलदैवताचे दर्शन

जेजुरी : अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या जेजुरीनगरीमध्ये माघ पौर्णिमा यात्रेनिमित्त परंपरेप्रमाणे मानाच्या काठ्या खंडोबा गडाला भेटविण्याचा सोहळा मोठ्या उत्साह आणि जल्लोषात पार पडला, तर दोन दिवसांत राज्यभरातून आलेल्या दोन लाखांहून अधिक भाविकांनी कुलदैवत खंडेरायाचे दर्शन घेतले. ‘सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जयमल्हार’चा जयघोष आणि भंडार खोबऱ्याची मुक्त हस्ताने झालेली उधळण सारा गडकोट पिवळ्याजर्द रंगात न्हाऊन निघाला होता. जेजुरी पोलिस ठाण्यात झालेल्या बैठकीत शांततेचे नियम पाळून काठ्यांची देवभेट उरकण्यात यावा. धार्मिक रूढी परंपरांचे जतन करीत यात्रा पार पाडावी, असे ठरले होते. त्याच पद्धतीने सोहळा पार पडला.

सकाळी ११ वाजता सुपे येथील खैरे व जेजुरीच्या होळकरांची काठी शहरातून मिरवणुकीने वाजतगाजत खंडोबा गडावर येऊन मंदिराला भेटली. यावेळी त्यांच्याबरोबर इतर प्रासादिक काठ्या होत्या, तर दुपारी १:३० वाजता होळकरांच्या चिंच बागेतून संगमनेर येथून आलेली मानाची होलम राजा काठी व इतर प्रासादिक काठ्या खंडोबा गडावर वाजत-गाजत मिरवणुकीने आल्या.

यावेळी खंडोबा गडावर देवस्थानचे मुख्य विश्वस्त अनिल सौंदडे, विश्वस्त मंगेश घोणे, पोपट खोमणे, ॲड. पांडुरंग थोरवे, ॲड. विश्वास पानसे, देवस्थानचे अधिकारी राजेंद्र जगताप, जेजुरीचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी त्यांचे स्वागत केले. संगमनेरची मुख्य शिखरी काठी इतर काठ्यांसह सकाळी १ वाजता चिंचेच्या बागेतून निघाली. वाटेत होळकरांचे छ्त्री मंदिर, मारुती मंदिराला भेटून दुपारी साडेचार वाजता शिखरी काठ्या गडावर पोहोचल्या यावेळी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ असा जयघोष करीत हजारो भक्त वाद्यवृंदाच्या तालावर नाचत होते. पिवळ्याधमक भंडाऱ्याची मुक्त उधळण झाल्याने संपूर्ण गड सोनेरी झाला. यावेळी भाविकांच्या आनंदाला उधाण आले होते. खंडोबा गडावर संगमनेर होलम काठीचे मानकरी तुकाराम काटे, दिलीप गुंजाळ, विलास गुंजाळ, कैलास शिंदे, सतीश कानवडे, तर सुपे (ता. बारामती) काठीचे मानकरी शहाजी खैरे, शरद खैरे, भगवान खैरे, देवीदास भुजबळ, नामदेव थोरात आणि स्थानिक होळकर काठीचे मानकरी बबनभाऊ बयास, सतीश गोडसे, बापू नातू, नितीन नातू, रोहिदास माळवदकर, छबन कुदळे, यांचा देव संस्थानकडून सन्मान करण्यात आला.

मानाच्या काठ्याबरोबर इतर प्रासादिक आलेल्या काठ्यांची संख्या यावर्षी जास्त होती. भाविकांनी ही मोठी उपस्थिती दर्शवली होती. जेजुरी शहरात ठिकठिकाणी राज्यभरातून आलेले भाविक आपले कुलधर्म कुळाचाराचे धार्मिक कार्यक्रम पार पाडीत होते. माघ पौर्णिमा आणि शिखर काठ्यांची देवभेटीचा सोहळा भाविक, ग्रामस्थ, मानकरी, त्याच बरोबर जेजुरी पोलिस प्रशासन सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल मार्तंड देव संस्थानचे प्रमुख विश्वस्त अनिल सौंदडे यांनी आभार मानले.

Web Title: Khandoba God gift of Mana peak stick in Jejuri; Over two lakh devotees took darshan of the deity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.