खळदचे आरोग्य केंद्रच सलाईनवर

By Admin | Updated: August 11, 2014 04:04 IST2014-08-11T04:04:10+5:302014-08-11T04:04:10+5:30

साधनांचा अभाव, इमारतीची झालेली दुरवस्था, जागोजागी पसरलेले घाणीचे साम्राज्य, यामुळे खळद (ता.पुरंदर) येथील नागरिकांना आरोग्याच्या प्राथमिक सुविधा पुरविणारे उपआरोग्य केंद्रच आजारी पडले आहे.

Khalde's health center on the saline | खळदचे आरोग्य केंद्रच सलाईनवर

खळदचे आरोग्य केंद्रच सलाईनवर

खळद : साधनांचा अभाव, इमारतीची झालेली दुरवस्था, जागोजागी पसरलेले घाणीचे साम्राज्य, यामुळे खळद (ता.पुरंदर) येथील नागरिकांना आरोग्याच्या प्राथमिक सुविधा पुरविणारे उपआरोग्य केंद्रच आजारी पडले आहे. यामुळे या रुग्णालयात ऐण्याऐवजी खासगी दवाखान्यात जाणे नागरिक पसंत करत आहेत.
खळद येथे बेलसर आरोग्य केंद्राचे उपकेंद्र आहे. पाच-सहा वर्षांपूर्वी सर्व सोर्इंनीयुक्त अशा आरोग्य उपकेंद्राची या ठिकाणी इमारत बांधण्यात आली. परंतु बांधकामानंतर आरोग्य अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य तसेच आरोग्य कमिटीच्या अधिकाऱ्यांनी इकडे दुर्लक्ष केल्याने या इमारतीच्या दुरवस्थेत भरच पडली आहे.
इमारत बांधताना एका बाजूच्या संरक्षक भिंतीचे काम तसेच आवारात पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे काम अर्धवट ठेवण्यात आले. यामुळे मोकाट जनावरांचा दवाखान्याच्या परिसरात वावर असतो. येथील कचरा दवाखान्याच्या परिसरातच टाकला जात असल्याने या ठिकाणी घाणीचे साम्राज्य तयार झाले आहे. यामुळे येथे येणाऱ्या लोकांना तसेच रुग्णांना तोंडावर रूमाल धरूनच यावे लागते. या भितींचे काम करण्याची वारंवार मागणी करण्यात आली; मात्र मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. याबाबत संबंधितांना विचारले असता, प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. इमारत सुसज्ज असतानाही येथील स्वच्छतागृहाची तसेच बाथरूमची दुरवस्था झाली आहे. दवाखान्यावरील पाण्याच्या सुविधेसाठी टाकी बांधण्यात आली; पाणी वर नेण्यासाठी मोटार नसल्याने ही टाकी वापराअभावी पडून आहे. पाणी असूनही दवाखान्यात पाण्याचा तुटवडा असतो. येथील असुविधांमुळे येथे होणाऱ्या गरोदर मातांच्या तपासणी शिबिरात अथवा लसीकरणास येणाऱ्या नागरिकांना याचा वापर करता येत नाही.
येथील नागरिकांनी हे आरोग्य केंद्र रोज किमान दोन तास तरी उघडे असावे अशी माफक अपेक्षा केली ; पण याला प्रतिसाद मिळत नाही. या कर्मचाऱ्यांना येथील कमी व बाहेरीलच जास्त कामे सांगितली जात असल्याचे समजते. येथे जर चांगल्या सुविधा मिळाल्या तर परिसरातील एखतपूर-मुंजवडी, खानवडीतील नागरिकही येथे येऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतील; पण येथील असुविधांमुळे हे शक्य नाही. (वार्ताहर)

Web Title: Khalde's health center on the saline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.