खळदला अढीवाचन : यंदा समाधानकारक पाऊस
By Admin | Updated: March 29, 2017 00:19 IST2017-03-29T00:19:03+5:302017-03-29T00:19:03+5:30
खळद (ता. पुरंदर) येथे पूर्वापार परंपरेनुसार गावच्या शंभूमहादेव मंदिरात देवाच्या साक्षीने आढीवाचन करण्यात आले.

खळदला अढीवाचन : यंदा समाधानकारक पाऊस
खळद : खळद (ता. पुरंदर) येथे पूर्वापार परंपरेनुसार गावच्या शंभूमहादेव मंदिरात देवाच्या साक्षीने आढीवाचन करण्यात आले. यानुसार यंदा समाधानकारक पाऊस पडणार असून राजाला चिंता तर प्रजा सुखी राहणार आहे.
येथे दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी अढीवाचन करण्याची परंपरा आहे. या परंपरेनुसार पाडव्याच्या आदल्या दिवशी मंदिर परिसरात मराठी बारा महिन्यांचे बारा, राजा, प्रजा असे १४ खड्डे घेऊन त्यात वडाच्या पानात ज्वारीचे धान्य ठेवून त्याच्या पुड्या या खड्ड्यात झाकून ठेवल्या जातात.
आज पाडव्याच्या दिवशी सकाळी गावातील सर्व शेकडो ग्रामस्थ एकत्र आले. त्यांच्या उपस्थितीत मानकरी साहेबराव कामथेपाटील यांच्या हस्ते व ग्रामपुरोहित अशोक खळदकर व पुजारी नंदकिशोर गुरव यांच्या पौरोहित्याखाली पूजा करीत अढीवाचन करण्यात आले.
या वेळी या पुड्यातील धान्याच्या ओलाव्यानुसार ज्येष्ठ, श्रावण, कार्तिक, भाद्रपद या महिन्यात समाधानकारक पाऊस पडेल, तर वैशाख, मार्गशीर्ष, आषाढ या महिन्यात मध्यम पाऊस पडेल, तर चैत्र, पौष, माघ, फाल्गुन, आश्विन या महिन्यात कमी पाऊस असल्याचे वाचन करण्यात आले. यामुळे ऐन मोसमात पाऊस पडण्याचा अंदाज दाखवण्यात आल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले व
पावसाच्या या भाकणुकीच्या जोरावर चांगली पिके येतील, अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
यानंतर पंचांगपूजा करून पुरोहित अशोक खळदकर यांनी पंचांगवाचन केले व सर्वांनी जनतेला हे नवीन वर्ष सुखाचेजावो व या भूमीत दुष्काळ हटवून सुकाळ येऊदे, असे साकडे शंभूमहादेवास घातले व महाआरती होऊन भाविकांना या धान्याचे वाटप करण्यात आले. (वार्ताहर)