कल्याण - नूतनीकरणाच्या कामासाठी दीड वर्षापासून बंद असलेल्या येथील आचार्य अत्रे रंगमंदिराची गुरुवारी चाचणी घेण्यात आली. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या कल्याण शाखेच्या पुढाकाराने कलाकारांनी नृत्य, गायन आणि नाट्य अशा विविध कला यावेळी सादर केल्या.सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रकाशयोजना, ध्वनियंत्रणा तसेच वातानुकूलित यंत्रणेची चाचणी करण्यात आली. या चाचणी प्रयोगाला अभिनेते, दिग्दर्शक व नाट्य कलाकार संघाचे अध्यक्ष प्रदीप कबरे आणि नाट्य परिषद व नाट्यनिर्माता संघाचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी नूतनीकरणाच्या कामाबाबत महापौर विनीता राणे यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांचे कौतुक केले.१ एप्रिल २०१७ पासून अत्रे नाट्यगृह दुरुस्तीसाठी बंद होते. हे नाट्यगृह कधी खुले होणार, याबाबतची उत्कं ठा कलाकारांप्रमाणेच रसिकांनाही होती. नूतनीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाल्याने १ आॅक्टोबर रोजी केडीएमसीच्या वर्धापनदिनी नाट्यगृह रसिकांसाठी खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यादिवशी विविध कार्यक्रमांच्या सादरीकरणातून नाट्यगृहाचा शुभारंभ केला जाणार आहे. तत्पूर्वी, गुरुवारी चाचणीचा प्रयोग येथे पार पडला. यावेळी गणेशवंदना, शिवस्तुती, अभंग, कथ्थक आणि भरतनाट्यम्चे विविध नृत्यप्रयोग, एकपात्री आणि बहुपात्री अभिनय आदी कला सादर करण्यात आल्या. यात तरुण कलावंतांनी सादर केलेले लावणी नृत्य विशेष आकर्षण ठरले. या चाचणी प्रयोगाला महापौर राणे, माजी महापौर आणि ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र देवळेकर, नगरसेवक विश्वनाथ राणे, सभागृह नेते श्रेयस समेळ, शिवसेना गटनेते दशरथ घाडीगावकर, नगरसेवक सुधीर बासरे, मनसे प्रदेश उपाध्यक्ष काका मांडले आदींसह ज्येष्ठ रंगकर्मी रवींद्र लाखे, प्रदीप कबरे, चारुदत्त भोर, निर्माते प्रसाद कांबळी, नाट्य परिषद कल्याण शाखेचे शिवाजी शिंदे, रंगमंदिराचे व्यवस्थापक तथा सहायक आयुक्त अमित पंडित आदी उपस्थित होते.महापौरांनी शब्द पाळला-प्रदीप कबरेरंगकर्मींच्या आयुष्यात काही आनंदाचे क्षण असतात. माझ्या जीवनातील आज सुवर्णक्षण आहे. रंगमंदिराचे काम सुरू असताना महापौरांच्या आग्रहाखातर पाहणी दौरा केला होता. त्यावेळी एक रंगकर्मी म्हणून माझ्याकडून काही सूचना मागितल्या होत्या. त्यावेळी महापौरांनी जे शब्द दिले होते, त्यांची पूर्तता झाली आहे.महापौरांनी दिलेला शब्द पाळला, अशा शब्दांत प्रदीप कबरे यांनी विनीता राणे यांचे कौतुक केले. आसनव्यवस्था, ध्वनियंत्रणा, प्रकाशयोजना चांगली झाली आहे. मेक अप आणि व्हीआयपी रूमदेखील चांगली बनवली आहे.रंगमंच कामगारांना नेपथ्य करण्यासाठी जे सामान आणावे लागते, तेदेखील सहज आणता येईल, अशी व्यवस्था याठिकाणी करण्यात आली आहे. एखाद्या पंचतारांकित हॉटेलप्रमाणे या नाट्यगृहाला साज चढवला असल्याचे कबरे म्हणाले.उर्वरित कामेहीलवकरच पूर्ण होतीलमुख्य नाट्य सभागृह, प्रसाधनगृह आणि वातानुकूलित यंत्रणेचे काम पूर्ण झाले आहे. लिफ्ट, कॉन्फरन्स हॉलसह इतर कामे अद्याप सुरू करण्यात आलेली नाहीत. काही कामांना सुरुवात करण्यात आल्याने बांधकाम साहित्याचा पसारा नाट्यगृहाच्या आवारात आहे. महत्त्वाची कामे झाली असून उर्वरित कामेही लवकरच मार्गी लावली जातील, अशी माहिती अधिकाºयांकडून देण्यात आली.नूतनीकरणाचे काम योग्यनाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम योग्य प्रकारे झाले असून एक कलाकार म्हणून चाचणी प्रयोगादरम्यान काम करताना खूप चांगले वाटले. प्रकाश आणि ध्वनियोजना उत्कृष्ट असून प्रयोग सादर करताना कोणतीही अडचण आली नाही. यापूर्वी रंगमंदिरातील परिस्थिती बिकट होती. नूतनीकरणाने नाट्यगृहाचे रूपडे पालटले आहे. प्रसाधनगृहाचे कामही चांगले झाले असल्याची प्रतिक्रिया कलावंत पूनम कुलकर्णी हिने व्यक्त केली.
अत्रे रंगमंदिराच्या नूतनीकरण चाचणीत केडीएमसी पास! सोमवारी शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 02:39 IST