कात्रज-कोंढवा रस्ता कमनशिबीच

By Admin | Updated: September 23, 2016 02:26 IST2016-09-23T02:26:26+5:302016-09-23T02:26:26+5:30

एक मंत्री, एक आमदार व महापालिकेचे दोन नगरसेवक असे मातब्बर असतानाही कात्रज-कोंढवा हा सुमारे १५ किलोमीटर अंतराचा रस्ता कमनशिबीच ठरला आहे.

Katraj-Kondhwa road passes through | कात्रज-कोंढवा रस्ता कमनशिबीच

कात्रज-कोंढवा रस्ता कमनशिबीच

राजू इनामदान, पुणे
एक मंत्री, एक आमदार व महापालिकेचे दोन नगरसेवक असे मातब्बर असतानाही कात्रज-कोंढवा हा सुमारे १५ किलोमीटर अंतराचा रस्ता कमनशिबीच ठरला आहे. उपनगरांमधील सर्वाधिक महत्त्वाच्या या रस्त्याची एखाद्या खेड्यातील रस्त्यासारखी दुर्दशा झाली आहे. गेली अनेक वर्षे रस्ता रुंदीकरणाची फक्त चर्चाच होत असून, त्याकडे महापालिका व सार्वजनिक बांधकाम खाते त्याचे काम करण्याकडे सातत्याने दुर्लक्ष करते आहे. त्यामुळे या रस्त्यावरून जाताना वाहनधारकांना रोजचीच सर्कस करावी लागत आहे.

कात्रजच्या मुख्य चौकापासून ते खडीमशिनपर्यंतचा सुमारे ६ किलोमीटरचा रस्ता पालिकेच्या हद्दीत आहे. त्यापुढचा थेट देवाची उरुळीपर्यंतचा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत आहे. महापालिकेत त्याचे प्रतिनिधित्व आमदार योगेश टिळेकर, नगरसेवक वसंत मोरे व भारती कदम हे करतात, तर पुढचा भाग पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार, विद्यमान जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांच्या मतदारसंघात येतो. पालिकेच्या ताब्यात असलेल्या रस्त्याची अवस्था जरा तरी बरी आहे; मात्र त्यापुढचा सर्व रस्ता खड्ड्यांचाच झाला आहे. पावसाचे पाणी साचून त्यावर ठिकठिकाणी तळे तयार झाले आहे.
गेल्या काही वर्षांत या परिसरात फर्निचरची फार मोठी बाजारपेठ तयार झाली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठमोठी विक्री दालने आहेत. त्यांच्याकडे सतत ग्राहक वाहने घेऊन येत असतात. जड वाहनांची वाहतूक रस्त्यावरून सतत सुरू असते. शहरातील कचरा भरून घेऊन उरुळीपर्यंत जाणारी पालिकेची सर्व वाहने याच रस्त्याचे जात-येत असतात. त्याशिवाय दुचाकीस्वारांची संख्या काही हजारांच्या घरात आहे. या सततच्या वाहतुकीने रस्त्याची जाळी झाली आहे. चिखलाचा रेंदा, त्यात घसरणारी वाहने, सातत्याने होत असलेले लहान-मोठे अपघात अशी रस्त्याची अवस्था झाली आहे.


1कात्रज चौकापासून पुढे खडीमशिनपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करण्याची गरज आहे. त्याकडे पालिका लक्ष द्यायला तयार नाही. त्याची मूळ रुंदी २८० फूट आहे. सध्या ती १०० फूटसुद्धा नाही. त्याच्या दोन्ही बाजूंना खासगी, सरकारी जागा आहेत. त्या ताब्यात घेऊन रस्ता रुंद करण्याची जबाबदारी पालिकेची आहे. पुरेशी रुंदी नसल्यामुळे कात्रजच्या चौकात रोज वाहतूककोंडी होत असते. चौकाच्या पुढे तो आणखी अरूंद झाला आहे. जागामालकांना नुकसाभरपाई देण्यासाठी पालिकेकडे पैसे नाहीत. मात्र त्यावर उपाय म्हणून आता सबंधितांना टीडीआर, एफएसआय, देण्याची तरतूद आहे. त्याचा वापर करण्यासाठी पालिका प्रशासन काही करायला तयार नाही.
2सार्वजनिक बांधकाम विभागाच्या(पीडब्ल्यूडी) अखत्यारीत येणाऱ्या रस्त्याची अवस्था सर्वांत खराब आहे. मातीचा असावा तसा हा रस्ता झाला आहे. गेल्या अनेक वर्षांत त्यावर डांबर टाकले गेलेले नाही. परिसरातील नागरिकांनाही रस्त्याचे काम कधी केले ते सांगता येत नाही. गेल्या काही वर्षांत या रस्त्यावरून जड वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रस्ता खराब झाला आहे. त्यासाठी काहीशे कोटी रूपये खर्च येईल. इतके पैसे अंदाजपत्रकातून मिळत नाहीत. त्यामुळे काँक्रीटचे थर टाकून रस्ता तयार करण्यात येणार आहे, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. मात्र, तेही काम व्हायला तयार नाही.
 

 

Web Title: Katraj-Kondhwa road passes through

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.