कार्तिक वद्य अष्टमिला हैबतबाबांचे पायरीपुजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:08 IST2020-12-09T04:08:51+5:302020-12-09T04:08:51+5:30
आळंदी : मर्यादित वारकऱ्यांच्या हातातील टाळ - मृदंगाच्या निनादात आणि दोन पुजाऱ्यांच्या मंत्रोच्चारात मंगळवारी (दि.८) सकाळी नऊला मंदिराच्या मुख्य ...

कार्तिक वद्य अष्टमिला हैबतबाबांचे पायरीपुजन
आळंदी : मर्यादित वारकऱ्यांच्या हातातील टाळ - मृदंगाच्या निनादात आणि दोन पुजाऱ्यांच्या मंत्रोच्चारात मंगळवारी (दि.८) सकाळी नऊला मंदिराच्या मुख्य महाद्वारातील गुरु हैबतबाबांच्या पायरीपूजनाने माऊलींच्या ७२४ व्या संजीवन समाधी सोहळ्यास सुरुवात करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या कार्तिकी वारी सोहळ्याला शासनाने विविध अटी - शर्ती घालून परवानगी दिली आहे. त्यामुळे मंदिरातील दैनंदिन धार्मिक तसेच परंपरेचे कार्यक्रम नियमावलींना अधीन राहून संपन्न होत आहेत.
माऊलींच्या मंदिर महाद्वारातील गुरू हैबतबाबांच्या पायरीपूजनाच्या मुख्य कार्यक्रमाला सकाळी ९ वाजता भक्तिमय वातावरणात सुरुवात करण्यात आली. सकाळी नऊच्या सुमारास माउलींच्या समाधी मंदिरापुढील महाद्वार चौकात गुरू हैबतबाबांच्या पायरीपूजनाच्या मुख्य कार्यक्रमास भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. माऊलींचे पुजारी श्रीनिवास कुलकर्णी व अमोल गांधी यांनी विधिवत पौराहित्य केले. गुरू हैबतबाबांच्या पायरीला दूध, दही, मध, साखर, तूप, अत्तराचे शिंपण, हारतुरे, पेढे अर्पण करत पालखी सोहळा मालक बाळासाहेब पवार, राजाभाऊ पवार आणि कुटूंबियांच्या हस्ते पूजन करण्यात आले. महाद्वारातील विधिवत पूजेनंतर माऊलींची आरती आणि पसायदान घेण्यात आले. त्यांनतर मंदिराला प्रदक्षिणा घालून माऊली मंदीरातील गुरू हैबतबाबांच्या ओवरीत आरती घेण्यात आली. याप्रसंगी प्रमुख विश्वस्त अभय टिळक, विश्वस्त ॲड. विकास ढगे, योगेश देसाई, वरीष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, रामभाऊ चोपदार, राजाभाऊ चोपदार, डी.डी. भोसले, राहुल चिताळकर, अजित वडगावकर, माऊली गुळूजकर, बाळासाहेब कुर्हाडे, दिनेश कुर्हाडे, योगेश आरु, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आदी मान्यवर उपस्थित होते.
सायंकाळी योगिराज ठाकूर आणि सायंकाळी ९ ते ११ बाबासाहेब आजरेकर यांची किर्तन सेवा झाली. गुरू हैबतबाबा पायरीसमोर रात्री १० ते पहाटे ४ पर्यंत वासकर महाराज, मारुती महाराज कराडकर आणि हैबतबाबा आरफाळकर यांच्या वतीने जागर पार पडला. हैबतबाबा वंशज्यांच्या वतीने विश्वस्त मंडळ आणि माऊलींच्या मानकऱ्यांना नारळप्रसाद देण्यात आला. दरम्यान आळंदी शहरात संचारबंदी लागू करण्यात आल्याने मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
* पहाटे विधिवत दुधारती व महापूजा
* महाद्वारात आकर्षक फुलांची सजावट.
* श्री. संत ज्ञानेश्वर महाराज, श्री. गुरु हैबतबाबा यांच्या आकर्षक फुलांनी सजवल्या प्रतिमा.
* मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत हरिनामाचा गजर
फोटो ओळ : तीर्थक्षेत्र आळंदीत माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याची गुरु हैबतबाबांच्या पायरीपूजनाने सुरुवात पालखी मालक, देवस्थानचे विश्वस्त व मान्यवर. (छायाचित्र : भानुदास पऱ्हाड)
२) गुरु हैबतबाबांच्या पायरीपूजन कार्यक्रमानंतर मंदिर प्रदक्षिणा घालताना वारकरी.(छायाचित्र : भानुदास पऱ्हाड)