कुरकुंभला कारगिल कंपनीच्या शालेय बसला अपघात
By Admin | Updated: March 23, 2017 04:03 IST2017-03-23T04:03:24+5:302017-03-23T04:03:24+5:30
येथील औद्योगिक क्षेत्रामधील कारगिल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कंपनीच्या शालेय बसला सकाळी सातच्या सुमारास

कुरकुंभला कारगिल कंपनीच्या शालेय बसला अपघात
कुरकुंभ : येथील औद्योगिक क्षेत्रामधील कारगिल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कंपनीच्या शालेय बसला सकाळी सातच्या सुमारास कारगिल ई-४ च्या मागील बाजूस असणाऱ्या रॉयल कत्था या कंपनीसमोर अपघात झाला. हा अपघात वाहनचालकाने वाहन बेफाम चालविल्यामुळे घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघातानंतर वाहनचालक फरार झाला असून रात्री उशिरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला नाही, तर जखमी विद्यार्थ्यांना कारगिल कंपनीच्या अम्बुलंसमधून दौंड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामधील किरकोळ जखमी विद्यार्थी मोहम्मद बांदार, संजना अग्री, सार्थक महातारेकर, हर्षदा शितोळे, श्रुती गुणवरे, शुभम घाडगे, नेहा इंदोरे, श्रद्धा घाडगे यांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले, तर माधवी सिद्धप्पा घाडगे (वय ११) हिच्या हाताला गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्यामुळे तिला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे .
कारगिल इंडिया कंपनीतील कामगार वसाहतीमधून शाळेसाठी सकाळी सातच्या सुमारास २६ मुला-मुलींना घेऊन जाणारी शालेय बस वळणावर वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे पलटी झाली. दरम्यान विजेच्या खांबाला जाऊन जोरात धडकल्यामुळे बसला मोठा अपघात होता होता वाचला. अन्यथा बस आणखी जोरात खड्ड्यात पडून मोठी दुर्घटना झाली असती. मात्र सुदैवाने ती टळली आहे. दरम्यान याच मार्गावरून अन्य कंपन्यांमधील कामगारदेखील कामावर जातात. त्यामुळे अत्यंत गंभीर अशी ही दुर्घटना मानली जात आहे.
कारगिल कंपनीने वेंकटेश ट्रॅव्हल्स कंपनीला शालेय बससाठी कंत्राट दिले आहे. शालेय वाहन चालवताना वेगाचे नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे. या वाहनांची वेळोवेळी तपासणी झाली आहे, की नाही हे पाहणे गरजेचे ठरणार आहे. मात्र अशा प्रकारच्या अपघातानंतर मात्र या सर्व प्रकारांत वशिलेबाजी व आर्थिक देवाणघेवाण करून प्रकरणे परस्पर मिटवली जातात. त्यामुळे सामान्य कामगार व त्यांच्या कुटुंबे मात्र यात भरडली जात आहेत. (वार्ताहर)