लागी करजवा कट्यार..!
By Admin | Updated: March 5, 2015 00:33 IST2015-03-05T00:33:51+5:302015-03-05T00:33:51+5:30
‘कट्यार काळजात घुसली’ या अजरामर संगीत नाटकावर बोलायला लागले, तर एक पुस्तक होईल, असे सांगताच फय्याज यांना ‘कट्यार’मधील गाणं म्हणण्याचा रसिकांनी आग्रह केला

लागी करजवा कट्यार..!
पुणे : ‘कट्यार काळजात घुसली’ या अजरामर संगीत नाटकावर बोलायला लागले, तर एक पुस्तक होईल, असे सांगताच फय्याज यांना ‘कट्यार’मधील गाणं म्हणण्याचा रसिकांनी आग्रह केला आणि त्यांनी ‘लागी करजवा कट्यार’ आणि ‘वो जो हम मे तुम मे करार था’ अशी दोन पदे त्याच बाजात आणि ठसठशीत आवाजात सादर करून सर्व माहोलच बदलून टाकला. त्याला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उभे राहून मानवंदना दिल्याने त्या
गहिवरल्या.
संध्या देवरुखकर संपादित गायक वसंत देशपांडे यांच्यावर आधारित ‘वसंत-बहार’ या पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा फय्याज यांच्या झाले. या वेळी त्या बोलत होत्या. संगीत समीक्षक अशोक रानडे, विजय देशपांडे व सु. वा. जोशी या वेळी उपस्थित होते. ‘कट्यार काळजात घुसली’च्या निमित्ताने तब्बल १६ वर्षे मला बापूंचा सहवास लाभला. ‘कट्यार’चे तब्बल ५३५ प्रयोग झाले. त्यांचे अभूतपूर्व तालमी, अवर्णनीय दौरे होते. या सर्व प्रयोगांमध्ये तब्बल ५३५ वेळा वेगवेगळे बापू आणि त्यांचे गाणे अनुभवले. आमच्यात मुलगी-वडिलांचे नाते होते, असे सांगत गहिवरल्या आवाजात असंख्य आठवणींचा कोलाज फय्याज यांनी उलगडला. (प्रतिनिधी)
४फय्याज म्हणाल्या, ‘‘बापूंमध्ये चंद्राची शीतलता आणि सूर्याची प्रखरता होती, असे मला वाटते. त्यांच्या सहवासात राहणे म्हणजे पर्वणीच. ‘कट्यार’ तर आमच्यासाठी गुरूकुलच होते. एक गायक, अभिनेते, असे वेगवेगळ्या प्रकारे ते आम्हाला मार्गदर्शन करत. खॉँसाहेबांच्या भूमिकेत ते भरभरून जगले. ते जसे आहेत तसे त्यामध्ये होते. अब्बाजानची ती हाक मी कोणत्या झरीणमधून आणू ही शेवटच्या प्रयोगाची बापूंची आठवण सांगताना तर फय्याज गहिवरल्या होत्या.
अलीकडे संगीतक्षेत्रात मोठ्या प्रमाणात तांत्रिकीकरण झाले आहे. मात्र, संगीताचा आत्मा असलेल्या अभिजात शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठ गायक, कलाकारांची नवोदितांना माहिती नाही. अशा वेळी या संगीताचे काय होणार, अशी चिंता वाटते.- अशोक रानडे, संगीत समीक्षक