‘कामधेनू’साठी जिल्ह्यातील २२७ गावांची निवड
By Admin | Updated: June 8, 2015 05:40 IST2015-06-08T05:40:23+5:302015-06-08T05:40:23+5:30
जिल्ह्याची दूध उत्पादनाची क्षमता वाढविण्याच्या प्रमुख उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या कामधेनु दत्तक ग्राम योजने अतंर्गत सन २०१५-१६ साठी पुणे जिल्ह्यात २२७ गावांची निवड करण्यात आली.

‘कामधेनू’साठी जिल्ह्यातील २२७ गावांची निवड
पुणे : जिल्ह्याची दूध उत्पादनाची क्षमता वाढविण्याच्या प्रमुख उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या कामधेनु दत्तक ग्राम योजने अतंर्गत सन २०१५-१६ साठी पुणे जिल्ह्यात २२७ गावांची निवड करण्यात आली असून, या गावांमध्ये पुढील वर्षभर राबविण्यात येणा-या विविध कार्यक्रमांचे प्रशासनाने वेळापत्रक जाहीर केले आहे.
याबाबत पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी समितीच्या सभापती सारीका इंगळे यांनी सांगितले की, जिल्ह्यात काही ठराविक गावांची कामधेनु दत्तक ग्राम योजनेसाठी निवड करण्यात येते. या योजनेत निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये उपलब्ध असलेल्या जनावरांना जिल्हा प्रशासना मार्फत मोफत विविध प्रकारचे लसीकरण करण्यात येते, त्याचबरोबर वैरण व्यवस्थापण, शेण व्यवस्थापन आदी अनेक गोष्टीची शेतक-यांना माहिती देण्यात येत. पुणे जिल्ह्यात गेल्या आठ-दहा वर्षांपासून ही योजना राबविण्यात येत असून, कामधेनु योजनेत निवड केलेल्या गावांच्या दूध उत्पादन क्षमतेत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून शासनेने संंपूर्ण राज्यात ही योजना लागू केली आहे.
यंदा पुणे जिल्ह्यात २२७ गावांमध्ये ही योजना राबविण्यात येत असून, या गावांमध्ये वर्षभर राबविण्यात येणा-या विविध कार्यक्रमांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
यामध्ये जून अखेर पर्यंत निवड झालेल्या गावांमध्ये पशुपालक मंडळांची स्थापना करणे, १५ आॅगस्ट, २ आॅक्टोबर आणि २६ जानेवारी रोजी ग्रामसभा घेऊन पशुपालकांसाठी प्रबोधन शिबिरे घेणे, आॅगस्ट, नोव्हेंबर आणि फेबु्रवारी महिन्यात जतनाशक शिबिर, गोचीड, गोमाशा निर्मुलन व वंध्यत्व निवारण व औषधोपचार शिबिरे घेणे, १५ जूनपूर्वी मान्सूनपूर्व लसिकरण मोहिम घेणे, जानेवारी-फेबु्रवारीमध्ये निकृष्ट चारा सकस करणे, जनावरांचे मलमुत्र व वाया गेलेल्या चा-यापासून खत व्यवस्थापन, डिसेंबरमध्ये पशुपालकांसाठी सहलीचे आयोजन करणे, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये संकरीत वासरांचा मेळावा व दुग्ध स्पर्धेचे आयोजन करणे आणि एप्रिल २०१६ मध्ये योजनाचे अंतिम सर्वेक्षण करुन फलश्रुती अहवाल सादर करण्यात येणार आहे.