काळभैरवनाथ व महालक्ष्मीमाता यात्रा उत्सवाची सांगता
By Admin | Updated: February 14, 2017 01:32 IST2017-02-14T01:32:13+5:302017-02-14T01:32:13+5:30
येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ व महालक्ष्मीमाता यात्रा उत्सवाची सांगता कुस्त्यांच्या जंगी आखाड्याने करण्यात आली. अखेरची कुस्ती

काळभैरवनाथ व महालक्ष्मीमाता यात्रा उत्सवाची सांगता
यवत : येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ व महालक्ष्मीमाता यात्रा उत्सवाची सांगता कुस्त्यांच्या जंगी आखाड्याने करण्यात आली. अखेरची कुस्ती मुंबई महापौर केसरी सागर बिराजदार व किरण भगत यांच्यात झाली. या कुस्तीला ८१ हजार रुपयांचे इनाम देण्यात आले.
सलग दोन दिवस सुरू असलेल्या गावाच्या यात्रेची सांगता कुस्त्यांच्या जंगी आखाड्याने होत असते. मोठ्या इनामाच्या कुस्त्यांसाठी यवतच्या यात्रेतील आखाडा प्रसिद्ध आहे. कुस्त्यांच्या आखाड्यात राज्य व परराज्यातील पैलवान मंडळींनी हजेरी लावली होती. अखेरच्या पाच कुस्त्या मानाच्या म्हणून लावण्यात येतात. यात यवतचा मल्ल मंगेश दोरगे विरुद्ध सातारचा शिवाजी जाधव, पुण्याचा किसन शेळके विरुद्ध राहूचा तुषार ठुबे, संदीप काळे विरुद्ध ज्ञानेश्वर बोचडे यांच्यात लावण्यात आल्या. मानाच्या कुस्त्यांमुळे आखाड्याची रंगत वाढली.
बारामतीचा अंगद गुदगुले व दिल्लीचा अमित कुमार व हरियानाचा अशोक कुमार व करमाळ्याचा दादा सरोदे यांच्यात चांगल्या लढती पाहण्याची संधी कुस्तीशौकिनांना मिळाली. मंगेश दोरगे, सुजित करडे, प्रदीप कोडीतकर या स्थानिक मल्लांनी कुस्त्या चितपट केल्या. याचबरोबर बारामती येथील कुस्ती समालोचक प्रशांत भागवत यांनी उत्कृष्ट समालोचन करीत आखाड्यातील घडामोडींचे चांगले विश्लेषण केले.
या वेळी पंचायत समिती सदस्य कुंडलिक खुटवड, उपसरपंच समीर दोरगे, देवस्थान कमिटीचे अध्यक्ष कोंडिबा दोरगे, माजी सरपंच दशरथ खुटवड, काळभैरवनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष नानासाहेब दोरगे, गजानन पतसंस्थेचे अध्यक्ष गोरख दोरगे, बाळासाहेब लाटकर, पंडित दोरगे, रमेश जैन, कैलास दोरगे, खंडू दोरगे, गणेश कदम, पापाभाई तांबोळी, दिलीप यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
तत्पूर्वी शुक्रवारी (दि. १०) यात्रेच्या पहिल्या दिवशी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यकम झाले. रात्रीच्या वेळी ढोल-ताशे व पारंपरिक वाद्यांच्या ताफ्यांसह देवाची पालखी काढण्यात आली. रात्री कुंदा पाटील पुणेकर यांचा लोकनाट्य तमाशा सादर करण्यात आला. यात्रेनिमित्त हजारो भाविकांनी हजेरी लावली होती. (वार्ताहर)