कदमवस्तीची शाळा ‘मॉडेल स्कूल’ बनविणार
By Admin | Updated: March 23, 2017 04:07 IST2017-03-23T04:07:04+5:302017-03-23T04:07:04+5:30
पुरंदर तालुक्यातील कदमवस्ती येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व प्रगती अत्यंत उत्कृष्ट असून

कदमवस्तीची शाळा ‘मॉडेल स्कूल’ बनविणार
जेजुरी : पुरंदर तालुक्यातील कदमवस्ती येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व प्रगती अत्यंत उत्कृष्ट असून, येथील ग्रामस्थांचे शाळेला मोठे सहकार्य मिळताना दिसते. ग्रामस्थांनी एक पाऊल पुढे टाकलेच आहे, तर मीही दोन पावले पुढे येऊन ही शाळा राज्यातील एक आदर्श असे मॉडेल स्कूल बनवणार, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी कदमवस्ती येथे केले आहे.
कदमवस्ती येथील शाळेसाठी ग्रामस्थांनी शाळेची गुणवत्ता पाहून स्वखुशीने सुमारे ४० लाख रुपये किमतीची ११ गुंठे जागा शाळेला बक्षीसपत्राने दिली आहे. जागेचे हस्तांतरण काल दि. २१ रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांच्याकडे करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘कदमवस्ती येथे इयत्ता चौथीपर्यंत शाळा आहे. शाळेतील ३८ विद्यार्थ्यांची प्रगती पाहून मी ही अचंबित झालो. शाळेचे शिक्षक अनंता जाधव व सुरेखा जाधव या दाम्पत्याबद्दल मी ऐकून होतो. आज प्रत्यक्ष अनुभव आला. अशा उपक्रमशील शिक्षकांची जिल्हा परिषदेला गरज आहे. यामुळे जिल्हा परिषदांच्या शाळांची गुणवत्ता इंग्रजी माध्यमापेक्षा चांगली राहील. साहजिकच जिल्हा परिषदांच्या शाळांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन ही बदलेल. येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन शाळेला जागा दिली आहे. यापुढे मीही या ठिकाणची शाळा राज्यातील एक आदर्शवत मॉडेल स्कूल बनवणार आहे. प्रथम येथे येण्यासाठी चांगला रस्ता करून घेऊ. तसेच इमारत उभी करण्यासाठी पुढील आठवड्यात मी स्वत; एक उत्कृष्ट आर्किटेक्चर पाठवून देतो. त्याच्याकडून शाळेचा उत्कृष्ट आराखडा बनवून घेऊ, त्याचा खर्च मी माझ्या पगारातून करेन. विविध सामाजिक संस्था, शासकीय निधी आणि लोकसहभागातून शाळेचे एक मॉडेल स्कूल बनवूया. ‘लोकमत’चे पत्रकार बी. एम. काळे यांनी ही शाळा दत्तक घेतलेलीच आहे. त्यांचे विशेष अभिनंदन करताना त्यांनी व ग्रामस्थांनीही यापुढे असेच सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण, गट शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, पंचाय समितीचे माजी उपसभापती माणिक झेंडे पाटील, पत्रकार बी. एम. काळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन कदम, उपाध्यक्ष श्रीकांत कदम, प्रा. के.एन.कदम आदींची भाषणे झाली. याच कार्यक्रमात शाळेला मदत करणारे संपत गरूड, बबन कदम, हनुमंत कदम, डॉ. अनिल कदम, पंढरीनाथ चव्हाण, शिवाजी कदम, गोकूळ कदम, संदीप कदम, लहू कदम, देवानंद कदम, सतीश कदम, संजय कदम, सुनील चव्हाण, प्रशांत कदम संभाजी गरूड आदींचा सन्मान यावेळी करण्यात आला.
यावेळी शालेय पोषण आहार अधीक्षक सुरेश वाघमोडे, बांधकाम शाखा अभियंता दिलीप जगताप, साकुर्डेच्या सरपंच तृप्ती जगताप, माजी सरपंच माईसाहेब जगताप, सदस्या सविता जगताप, वनिता जगताप, संग्राम सस्ते, विस्तारअधिकारी राम लाखे, नीलिमा म्हेत्रे, केंद्रप्रमुख सुरेश मोरे आदींसह ग्रामस्थ, महिला, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संदीप कदम यांनी स्वागत केले. मुख्याध्यापक अनंता जाधव यांनी प्रास्ताविक केले, हभप रवींद्रमहाराज जाधव यांनी सूत्रसंचालन, तर
प्रकाश जगताप यांनी आभार मानले. (वार्ताहर)