काद्यांचे भाव कोसळले!
By Admin | Updated: December 11, 2015 00:55 IST2015-12-11T00:55:33+5:302015-12-11T00:55:33+5:30
कांद्याचे बाजारभाव कोसळले आहेत. कांदा प्रती १० किलोस १०० ते १४० रुपये या दराने आज मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत विकला गेला.

काद्यांचे भाव कोसळले!
मंचर : कांद्याचे बाजारभाव कोसळले आहेत. कांदा प्रती १० किलोस १०० ते १४० रुपये या दराने आज मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत विकला गेला. कांद्याचे बाजारभाव कोसळल्याने शेतकरीवर्गाने नाराजी व्यक्त केली आहे. या बाजारभावाने शेतकऱ्यांचे भांडवल वसूल होणार नाही.
बाजारात सध्या नवीन कांदा विक्रीसाठी येतो. मात्र, कांद्याचे बाजारभाव दिवसेंदिवस ढासळत चालले आहेत. मंगळवारी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या लिलावात कांद्याला १० किलोस १५० रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला होता. आज गुरुवारी कांद्याचे बाजारभाव अजून कमी झाले. १० किलोस १०० ते १४० रुपये असा बाजारभाव मिळाला. गुलटी कांदा ३० ते ३५ रुपये, तर बदला कांदा १० ते १५ रुपये १० किलो या भावाने विकला गेला. बाजार समितीत आज सुमारे १५०० पिशवी कांद्याची आवक झाली. लिलावानंतर कांद्याचे बाजारभाव ढासाळले, त्यानंतर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. वातावरणात बदल झालेला आहे. त्याचा परिणाम नगदी पिकांवर दिसून येतो. परिणामी कमी प्रतीचा कांदा बाजार समितीत विक्रीस येत असल्याने बाजारभाव ढासळले आहेत. कांद्याचे निर्यातमूल्य जास्त असल्याने बाजारभाव कमी मिळत असल्याची माहिती व्यापारी के. के. थोरात यांनी दिली.
वातावरणात वारंवार बदल होत असल्याने शेतकऱ्यांना कांदा पिकावर महागडी औषध फवारणी करावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांचा भांडवली खर्च वाढू लागला आहे. त्यात कांद्याचे बाजारभाव ढासळल्याने शेतकरी हतबल झाला आहे. त्यांचे भांडवलसुद्धा वसूल होणार नाही. नजीकच्या काळात कांद्याचे बाजारभाव वाढण्याची कुठलीही शक्यता नसल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. (वार्ताहर)