‘लक्ष्मीदर्शना’वरून जुंपली
By Admin | Updated: April 14, 2017 04:25 IST2017-04-14T04:25:53+5:302017-04-14T04:25:53+5:30
ऐनवेळचे विषय न स्वीकारण्याच्या घोषणेचा स्थायी समितीला दुसऱ्याच सभेत विसर पडला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी सल्लागार नेमण्याच्या ऐनवेळच्या सव्वा कोटीच्या

‘लक्ष्मीदर्शना’वरून जुंपली
पिंपरी : ऐनवेळचे विषय न स्वीकारण्याच्या घोषणेचा स्थायी समितीला दुसऱ्याच सभेत विसर पडला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी सल्लागार नेमण्याच्या ऐनवेळच्या सव्वा कोटीच्या विषयाला मंजुरी दिली. ‘राष्ट्रवादीच्या कामकाजाला आक्षेप घेणाऱ्या भाजपानेही लक्ष्मीदर्शनाची सुरुवात केली की काय, अशी टीका सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे. तर ‘धोरणात्मक प्रस्ताव आणि सदस्यांनी मांडलेले ऐनवेळचे प्रस्ताव याच्यातील फरक कळत नसलेल्यांची प्रसिद्धीसाठी भंपकबाजी आहे, असे प्रत्युत्तर स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी दिले आहे.
स्थायी समिती अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच अध्यक्षा सावळे यांनी पारदर्शी कारभार करण्याचे अभिवचन दिले. ऐनवेळचे विषय स्वीकारणार नाही, वाढीव खर्चास मान्यता देण्यात येणार नाही, अशा घोषणा केल्या होत्या. बैठकीला पत्रकार बसण्याचा क्रांतिकारक निर्णयही घेतला. मात्र, या घोषणेचा सात दिवसांच्या आतच विसर पडल्याचे दिसत आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी काढलेल्या पत्रकावरून भाजपा आणि भापकर यांच्यात जुंपली आहे. ‘प्रशासनाचा प्रस्ताव असल्याचे सांगत भाजपाने सारवासारव केली आहे. एकाच सभेत स्मार्ट सिटीबाबत सर्वेक्षण करण्याबाबतचा विषय तहकूब ठेवण्यात आला. दुसरीकडे पंतप्रधान आवास योजनेचे सर्वेक्षण करण्यासाठीच्या संस्थेचा ऐन वेळचा विषय मंजूर करण्यात आला. त्यामुळे विरोधी पक्षांनी भाजपांवर जोरदार टीका केली आहे.(प्रतिनिधी)
धोरणात्मक प्रस्ताव आणि सदस्यांनी मांडलेले ऐनवेळचे प्रस्ताव यांच्यातील फरक कळत नसेल, तर त्यांनी ज्या भागातील नागरिकांचे कधी काळी प्रतिनिधित्व केले, त्या मतदारांचे दुर्दैव होते, असेच म्हणावे लागेल. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गरजूंना घर देण्यात
येणार आहे. त्यासाठी आधी लाभार्थी निश्चित करावे लागणार आहेत. या सभेत कोणतेही ऐनवेळचे सदस्यप्रस्ताव किंवा वाढीव खर्चाचे प्रस्ताव मंजूर केलेले नाहीत.- सीमा सावळे, अध्यक्ष, स्थायी समिती
निवडणुकीत भय, भ्रष्टाचारमुक्त पालिका व पारदर्शक कारभार या घोषवाक्यांवर आपण व आपल्या पक्षाने निवडणुका जिंकल्या़ यानंतर वाढीव खर्चाच्या उपसूचना, ऐनवेळचे विषय व वर्गीकरण हे घेणार नाही. अधिकारी, ठेकेदार व सल्लागार यांची साखळी तोडणार अशा स्वरूपाच्या घोषणा केल्या आहेत. पंतप्रधान आवास योजनेसाठी सर्व्हे करण्यासाठीचा विषय ऐनवेळी मंजूर केला. कोणत्या लक्ष्मी दर्शनामुळे भूमिका बदलली? - मारूती भापकर, सामाजिक कार्यकर्ते