यात्रा, उत्सव, आखाडे जिथे, उमेदवार धावे तिथे तिथे

By Admin | Updated: February 10, 2017 02:59 IST2017-02-10T02:59:59+5:302017-02-10T02:59:59+5:30

निवडणूक प्रचारासाठी हाती राहिलेले मोजके दिवस लक्षात घेऊन जिथे गर्दी तिथे प्रचार हे धोरण सध्या राजकीय नेत्यांनी जिल्ह्यात ठेवले

Journeys, festivals, Akhada, where the candidates are there | यात्रा, उत्सव, आखाडे जिथे, उमेदवार धावे तिथे तिथे

यात्रा, उत्सव, आखाडे जिथे, उमेदवार धावे तिथे तिथे

घोडेगाव (वार्ताहर) : निवडणूक प्रचारासाठी हाती राहिलेले मोजके दिवस लक्षात घेऊन जिथे गर्दी तिथे प्रचार हे धोरण सध्या राजकीय नेत्यांनी जिल्ह्यात ठेवले असल्याचे दिसून येते. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत गावोगावी यात्रांचा हंगाम सुरू झाल्याने ती लोकांच्या प्रत्यक्ष भेटीची पर्वणी ठरत आहेत. त्यामुळे गावोगावी होणाऱ्या अशा उत्सवाचा राजकीय नेते पुरेपूर फायदा घेत आहेत. यात्रेनिमित्त सुरू असलेले अखंड हरिनाम सप्ताह, काल्याचे कीर्तन, तमाशा, भारूडांचे कार्यक्रम व कुस्त्यांचा आखाडा यामध्ये जाऊन प्रचार करण्यावर मोठा भर दिला जात असल्याचे चित्र ठिकठिकाणी आहे.
उमेदवारी अर्जांसोबतच एबी फॉर्म दिले असल्याने प्रमुख पक्षाचे जवळजवळ उमेदवार निश्चित झाले आहेत. दि.१३ रोजी माघार व दि.२१ रोजी मतदान असून, अवघा ६ दिवसांचा कालावधी प्रचारासाठी मिळणार आहे म्हणून उमेदवार व नेते मंडळी आत्तापासूनच प्रचाराच्या धामधुमीत लागले आहेत. उमेदवार व नेतेमंडळी लोकांपर्यंत पोहोचण्याची कोणतीच संधी सोडत नाही.
घरोघरी जाऊन प्रचार करण्याबरोबरच वैयक्तिक, सार्वजनिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन प्रचार करण्याचे माध्यम कोणीही सोडत नाही. लग्नकार्य, दशक्रिया, गंधाचे कार्यक्रम, साखरपुडे, वास्तुशांती अशा कार्यक्रमांपासून यात्रेतील कुस्त्यांचे आखाडे व रात्रीच्या तमाशाचा नारळ फोडण्याचा कार्यक्रमासदेखील सर्व नेतेमंडळी हजेरी लावतात. एकाच कार्यक्रमात सर्व पक्षांचे उमेदवार येत असल्याने कधी नाही ते मोठ्या संख्येने पुढारी गावोगावच्या कार्यक्रमांना दिसू लागले आहेत. दशक्रियांमध्ये भाषण करण्यासाठी चढाओढ लागत आहे, या भाषणांमुळे दशक्रिया विधी संपण्यास उशीर होतो व लोकांना नदीवर उन्हात तापत बसावे लागते, मात्र भावपूर्ण श्रद्धांजलीचे भाषण करणारे थांबत नाहीत. लग्नांमध्येदेखील अशीच परिस्थिती होते. भाषण करणाऱ्यांमुळे मुहूर्त टळून जातो.
नुकतेच आंबेगाव तालुक्यातील पोखरी गावची यात्रा झाली. येथे यात्रेनिमित्त आयोजित कुस्त्यांच्या जंगी आखाड्यास खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उपस्थिती लावली. या वेळी त्यांच्या हस्ते नामवंत मल्लांची कुस्ती जुंपण्यात आली. या वेळी त्यांनी गावकऱ्यांना यात्रेच्या शुभेच्छा दिल्या.
तर विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सुपेधर येथे मायंबानाथ यात्रा उत्सवानिमित्त आयोजित झालेल्या काल्याच्या कीर्तनाला हजेरी लावली व ग्रामस्थांना शुभेच्छा. तसेच बोरघर, फुलवडे, गंगापुर, गोहे खुर्द, गोहे बुद्रूक येथे भेटि दिल्या. या वेळी आदिवासी भागात केलेल्या विकासकामांचा आढावा त्यांनी मांडला. पडकई योजना, आश्रमशाळेच्या इमारती, आदिवासी मुलींची इंग्रजी माध्यमाची शाळा, रस्त्यांचे जाळे अशा केलेल्या उल्लेखनीय कामांचा लेखाजोखा ग्रामस्थांसमोर मांडून प्रचार केला.

रानावनात, शेतात जाऊनही भेटीगाठी
कारेगाव : जिल्हा परिषद व पंचायत समितीचा निवडणूक प्रचार आता जोर धरू लागला आहे. सध्या रब्बी हंगामातील पिके जोमदार आल्याने शेतकरी दिवसभर रानातच काम करीत आहेत. त्यामुळे उमेदवार आता चक्क रानावनात फिरताना दिसत आहेत. अशा उमेदवाराची मतदारही फिरकी घेत आहेत.
वाढत्या उन्हामुळे वातावरण तापत आहे. त्याचबरोबर प्रचारही जोर धरू लागला आहे. ग्रामीण भागात बहुतांश नागरिकांचा शेती व्यवसाय आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांची खुरपणी चालू आहे, तर काही ठिकाणी कांदाकाढणी सुरू आहे. तर, पिकांना पाणी देताना शेतकरी शेतात दिसत आहेत. शेतात कामे असल्याने एकाच ठिकाणी १० ते २० लोक सापडत आहेत. त्यामुळे उमेदवारही अशा ठिकाणी आवर्जून जात आहेत. आपुलकीने चौकशी करीत आहेत. नेक नागरिक उमेदवाराना जाब विचारत आहेत, तर उमेदवारही ‘अच्छे दिन येतील,’ असे सांगत आहेत.

Web Title: Journeys, festivals, Akhada, where the candidates are there

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.