भोर-पुणे रस्त्यावरचा प्रवास झाला जीवघेणा
By Admin | Updated: July 13, 2015 04:24 IST2015-07-13T04:24:23+5:302015-07-13T04:24:23+5:30
भोर-पुणे राज्यमार्गावरील नीरा व गुंजवणी नदीवर असलेल्या तीनही पुलांचे संरक्षक कठडे तुटलेले, अरुंद मोऱ्या तसेच दिशार्दशक फलक नाहीत

भोर-पुणे रस्त्यावरचा प्रवास झाला जीवघेणा
भोर : भोर-पुणे राज्यमार्गावरील नीरा व गुंजवणी नदीवर असलेल्या तीनही पुलांचे संरक्षक कठडे तुटलेले, अरुंद मोऱ्या तसेच दिशार्दशक फलक नाहीत. यामुळे रात्री-अपरात्री अपघात झालेले आहेत. त्यामुळे पुन्हा एखादी गाडी नदीपात्रात पडून अपघात घडण्याचा धोका आहे. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांसह वाहनचालक नाराजी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे भोर-पुणे रस्त्यावरचा जीवघेणा प्रवास झाला आहे.
कोकणात जाणारे पर्यटक मांढरदेवीला जाणारे भाविक व भोर तालुक्यातील वीसगाव, हिर्डोशी, वेळवंड खोऱ्यासह भोर शहरात जाणारा हा मार्ग असल्याने मोठ्या प्रमाणात सतत वाहतुकीची वर्दळ असते. मात्र या रस्त्यावरच्या अनेक ठिकाणच्या मोऱ्या अरुंद आहेत. दिशादर्शक अपघातप्रवण क्षेत्राचे फलक लावलेले नाहीत. गावांच्या, मार्गाच्या नावाच्या पाट्या लावलेल्या नाहीत. यामुळे अनेकदा कोकणात जाणाऱ्या प्रवासी मार्ग चुकून भलतीकडेच जातात. याशिवाय रस्त्यावर सांगवी गावाजवळच्या नीरा नदीवर हारतळी गावाच्या पुढील नदीवर व कासुर्डी गु. मा येथील गुंजवणी नदीवरील पुलांचे संरक्षक कठडे अनेक दिवसांपासून तुटलेले आहेत; मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
यापूर्वी सांगवी येथील पुलावरून एक टेंपो, तर संगमनेर गावाच्या मागे असलेल्या पुलावरून पॅसेंजर जीप रात्रीच्या वेळी नीरा नदीत पडून झालेल्या अपघातात काही जण जखमी झाल्याची घटना घडली होती. मात्र त्यानंतरही या पुलावरील संरक्षक कठडे दुरुस्त करण्यात आले नाहीत, तर भोर एसटी स्टॅँडवरील नीरा नदीवरील जुन्या व नवीन पुलाच्या दोन्ही बाजूला संरक्षक भिंत नसल्याने मोठे खड्डे पडले आहेत. त्यात गवत उगवले आहे.
राजा रघुनाथ विद्यालयाच्या समोरील बाजूला मोठे गटार असून रस्ता अरुंद झाला आहे. भोरकडून जाणाऱ्या व पुण्याकडून येणाऱ्या गाड्या एकाच ठिकाणी एकत्र येत असून भाजी विक्रेते व इतर दुकाने रस्त्यावरच आहेत. या ठिकाणी कोणत्याच प्रकारचे दिशादर्शक फलक लावलेले नाहीत. त्यामुळे हे अपघातप्रवण क्षेत्र झाले आहे, तर बुवासाहेबवाडीजवळच्या वळणावरची मोरी अरुंद असून अनेक दिवसांपासून या मोरीचे रुंदीकरण करण्याची मागणी करूनही ती करण्यात आली नाही.
वळणामुळे वाहने दिसत नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. महुडे व वेळवंड खोऱ्याकडे जाणाऱ्या मार्गावर कोणत्याच प्रकारचे फलक लावलेले नाहीत. त्यामुळे अनेकदा पुण्यावरून आलेली वाहने कोकणात जाण्याऐवजी या बाजूकडे वळतात, अशाही घटना वारंवार घडत आहेत; मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे.
बांधकाम विभागाने नद्यांच्या पुलावरील संरक्षक कठडे बसण्याबरोबर दिशादर्शक व गावांच्या मार्गाच्या नावांचे फलक लावण्यासह मोऱ्यांचे रुंदीकरण करणे गरजेचे
आहे. (वार्ताहर)