जिरणार ‘अब्ज’ रुपये
By Admin | Updated: February 15, 2017 01:56 IST2017-02-15T01:56:37+5:302017-02-15T01:56:37+5:30
जिल्हा परिषद तसेच महापालिका निवडणूकांसाठी उमेदवारांकडून मतदारांपर्यंत पोचण्यासाठी करण्यात येणारा जाहीरात खर्च, कार्यकर्त्यांच्या

जिरणार ‘अब्ज’ रुपये
पुणे : जिल्हा परिषद तसेच महापालिका निवडणूकांसाठी उमेदवारांकडून मतदारांपर्यंत पोचण्यासाठी करण्यात येणारा जाहीरात खर्च, कार्यकर्त्यांच्या भोजनावळी, झेंडे, उपरणी, बॅनर, अहवाल यावर होणाऱ्या रुपयाचा वैध आकडा धरला तरी तो, १२० कोटी २० लाख रुपयांच्या घरात जातो. सध्या विविध वस्तूंचे भाव जरी लक्षात घेतले, तरी हा खर्च किमान दोन अब्जांवर असेल, असेच दिसून येत आहे.
निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या मर्यादेनुसार प्रत्येक उमेदवाराला जास्तीत जास्त १० लाख रुपयांपर्यंत खर्च करण्याची मुभा आहे. प्रत्येक उमेदवाराने हा निधी खर्च केल्यास किमान १२० कोटी २० लाख रुपये खर्च होतील. अर्थात दहा लाख रुपयांच्या आत खर्च करणारे काही सन्माननीय अपवादही असतील. मात्र त्याचप्रमाणे अनेकदा दाखविला जाणारा खर्च आणि प्रत्यक्ष होणारा खर्च यात बरीच तफावत असल्याचे सहज लक्षात येते.
काही जणांनी तर प्रचारासाठी पक्षाच्या चिन्हाचा रथच तयार केला आहे. काहींनी लोकप्रिय गाण्यांचा आधार घेत चित्रफित केली आहे. अनेक उमेदवारांनी घोषणा लिहून देण्यासाठी व्यावसायिक लेखकांची मदत घेतली आहे. या शिवाय छापील अथवा डिजिटल मतदार स्लीप देण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात येत आहे. काहींनी डिजिटल स्लीप वाटपासाठी ८ ते नऊ हजार रुपयांचे यंत्र देखील खरेदी केले आहे.
पक्षाचे चिन्ह मतदारांपर्यंत पोचविण्यासाठी चिन्ह असलेली उपरणी, टोप्या, बॅच-बिल्ले, झेंडे, पेशवाई पगड्या यांना देखील मोठ्या प्रमाणावर मागणी असून, प्रत्येक उमेदवार सरासरी शंभर ते दोनशे उपरणे, बॅच आणि बिल्ल्यांची खेरदी करीत आहे. बाजारात बॅचची किंमत २ ते १०० रुपये, पक्ष चिन्ह असलेली टोपी १० ते ३५, उपरणी ७ ते साडेतीनशे रुपये, तर पेशवाई पगडीची किंमत १ हजार ते २ हजार रुपयांदरम्यान आहे. या शिवाय पक्ष चिन्हाच्या कट आऊटसाठी आकारानुसार ५० ते दोनशे रुपये दर असल्याची माहिती मुरूडकर झेंडेवाले’चे गिरीष मुरूडकर यांनी दिली.