रिक्षात विसरलेले दागिने, रोकड ज्येष्ठाला दिले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:07 IST2020-11-28T04:07:46+5:302020-11-28T04:07:46+5:30
पुणे : रिक्षा प्रवासातील दागिने, रोकड असलेली पिशवी विसरल्यानंतर फरासखाना पोलिसांनी तत्परतेने तपास करून रिक्षाचालकाचा शोध घेतला आणि ज्येष्ठ ...

रिक्षात विसरलेले दागिने, रोकड ज्येष्ठाला दिले परत
पुणे : रिक्षा प्रवासातील दागिने, रोकड असलेली पिशवी विसरल्यानंतर फरासखाना पोलिसांनी तत्परतेने तपास करून रिक्षाचालकाचा शोध घेतला आणि ज्येष्ठ नागरिकाला पिशवी परत मिळवून दिली. पिशवीतले साडेआठ तोळे दागिने आणि वीस हजारांची रोकड ज्येष्ठ नागरिकाला परत मिळाल्याने त्यांनी पोलिसांचे मनोमन आभार मानले.
एका ७६ वर्षीय ज्येष्ठ नागरिक दोन दिवसांपूर्वी रिक्षाने जात असताना त्यांच्याकडील पिशवीत सोन्याचे दागिने आणि वीस हजारांची रोकड होते. प्रवासादरम्यान गडबडीत पिशवी रिक्षात विसरली. कसबा पेठेत जेष्ठ नागरिक रिक्षातून उतरल्यानंतर त्यांना हे लक्षात आले आणि त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.
हवालदार सयाजी चव्हाण, आकाश वाल्मिकी यांनी या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण पडताळले. चित्रीकरणात रिक्षाचा वाहन क्रमांक मिळाला. रिक्षाचालक जालिंदर अंकुश खुटवड (रा. नसरापूर, ता. भोर) यांच्या मालकीची रिक्षा असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध घेतला. खुटवड यांच्या मोबाइल क्रमांकावर पोलिसांनी संपर्क साधला. रिक्षात पिशवी विसरली असून, त्यात ऐवज असल्याची माहिती पोलिसांनी त्यांना दिल्यानंतर रिक्षाचालक खुटवड त्वरीत फरासखाना पोलीस ठाण्यात आले. त्यांनी पोलिसांना पिशवी परत केली. पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकाला पिशवी दिली. त्यांनी पोलिसांचे आभार मानले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, गुन्हे शाखेचे निरीक्षक दादासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अभिजीत पाटील, रिजवान जिनेडी, मल्लीकार्जुन स्वामी, अमोल सरडे, महावीर वलटे, मयूर भोकरे यांनी ही कामगिरी केली.
---