सत्ताधाऱ्यांना आणले जेरीस

By Admin | Updated: March 23, 2017 04:36 IST2017-03-23T04:36:59+5:302017-03-23T04:36:59+5:30

शहरातील उद्यानांमध्ये देण्यात येणारी वायफाय सुविधा, विद्यार्थ्यांसाठीचा शालेय पोषण आहार, मिळकतकर आॅनलाइन जमा करणाऱ्यांना सवलत,

Jerez brought to power | सत्ताधाऱ्यांना आणले जेरीस

सत्ताधाऱ्यांना आणले जेरीस

पुणे : शहरातील उद्यानांमध्ये देण्यात येणारी वायफाय सुविधा, विद्यार्थ्यांसाठीचा शालेय पोषण आहार, मिळकतकर आॅनलाइन जमा करणाऱ्यांना सवलत, अशा काही विषयांवर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना, मनसे या विरोधकांनी आक्रमक भाष्य करीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला जेरीस आणले. त्यातून काही विषयांना मंजुरी मिळाली, तर काही विषय पुढील सभेच्या विषयपत्रिकेत ढकलले गेले. भाजपानेही विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.
शहरातील उद्यानांसह विविध भागात ‘वाय-फाय’ सुविधा पुरविण्याचे काम सध्या सुरू आहे. सर्वसाधारण सभेला विश्वासात न घेताच परस्पर हे काम सुरू केल्याचा आरोप विरोधकांनी केला. या सुविधेसाठी उद्यानांमध्ये बेकायदा खोदाई सुरू आहे, त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. महत्त्वाचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना या सुविधेचा अट्टहास का, असा सवाल विरोधी पक्षनेते चेतन तुपे, अरविंद शिंदे यांनी केला. राष्ट्रवादीचे दिलीप बराटे, दीपक मानकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते वसंत मोरे, अविनाश बागवे यांनी या विषयावर विविध मुद्दे उपस्थित करीत आयुक्तांना धारेवर धरले. महापौर मुक्ता टिळक यांना सर्व काम कायदेशीरपणेच सुरू असल्याचा खुलासा आयुक्त कुणाल कुमार यांनी केला.
आॅनलाइन पद्धतीने मिळकतकर जमा करणाऱ्यांना ५ टक्के सवलत देण्याच्या विषयावरही विरोधकांनी गदारोळ केला. काही वर्षांपूर्वी ३ टक्के नागरिक आॅनलाइन कर जमा करीत होते. आता ही संख्या ३१ टक्के झाली आहे. असे असताना त्यांना कशासाठी सवलत द्यायची, या सुविधेचा वापर करणाऱ्यांचा वर्ग मूठभरच आहे; पण ही सुविधा नाही, असे करदाते संख्येने अधिक आहेत. ते प्रामाणिकपणे कर जमा करीत असतील, तर मग त्यांनाही सवलत द्यावी, थकबाकीदारांनाही यात सवलत देण्यात आली आहे. यावर शिंदे, तुपे, मानकर, दिलीप बोराटे यांनी टीका केली. मिळकतकर विभागाचे उपायुक्त सुहास मापारी यांनी या विषयाची माहिती दिली. विषय दुरुस्त करून पुढील सभेत आणावा, या विरोधकांनी आक्रमकपणे केलेल्या मागणीला सत्ताधाऱ्यांना रूकार द्यावा लागला.
शालेय पोषण आहाराबरोबरच विद्यार्थ्यांनी अंडी, खजूर व अन्य फळफळावळ देण्याच्या विषयाची माहिती देताना अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी मंगळवार, बुधवार, शुक्रवार अंडी व इतर दिवशी फळे देण्यात येतील, असे सांगितले. हे दिवस कोणी ठरवले, अशी विचारणा यावर शिंदे यांनी केली. सत्ताधारी भाजपाच्याच शंकर पवार व अन्य काही सदस्यांनी निकृष्ट फळे दिली जात असल्याची तक्रार केली. रोजच अंडी व फळे दिली जावीत, ज्याला जे हवे असेल ते खातील, अशी सूचना तुपे यांनी केली. त्यामुळे खर्च वाढेल, असे जगताप यांनी निदर्शनास आणले. पोषण आहार पुरवणाऱ्या बचत गटांना गेले काही महिने मानधन दिले जात नसल्याचे चंचला कोद्रे
म्हणाल्या.
वर्षा तापकीर, माधुरी सहस्रबुद्धे आदींनी या चर्चेत भाग घेतला. हाही विषय दुरुस्त करून पुढील सभेत घेण्याचे ठरवण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Jerez brought to power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.