जेजुरीतील मोबाईल टॉवर केला सील
By Admin | Updated: March 24, 2017 04:00 IST2017-03-24T04:00:18+5:302017-03-24T04:00:18+5:30
जेजुरी नगरपालिकेची सन २०१६-१७ या वित्तीय वर्षाची घरपट्टी, पाणीपट्टी व इतर करांची वसुलीची मोहीम सुरू आहे.

जेजुरीतील मोबाईल टॉवर केला सील
जेजुरी : जेजुरी नगरपालिकेची सन २०१६-१७ या वित्तीय वर्षाची घरपट्टी, पाणीपट्टी व इतर करांची वसुलीची मोहीम सुरू आहे. त्याअनुषंगाने थकबाकीदार असलेल्या भारती सेल्युलर प्रा.लि. या मोबाईल कंपनीचा टॉवर बुधवारी (दि. २२) सील करण्यात आला. मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी ही कारवाई केली.
तीन आठवड्यांपासून जेजुरी नगरपालिकेची करवसुलीची धडक मोहीम सुरू आहे. मालमत्ता कर थकबाकीदारांच्या घरासमोर वाजंत्री वाजवून करभरणा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मुख्याधिकाऱ्यांसह अधिकारी-कर्मचारी वर्गाने शासकीय सुट्या रद्द करून करवसुलीला प्राधान्य दिले आहे. आतापर्यंत ५४ मोठ्या थकबाकीदारांची नावे मुख्य चौकांतील फ्लेक्सवर झळकावून ४४ जणांना मालमत्ताजप्तीच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. २७५ नागरिकांची नळ कनेक्शन तोडण्यात आली आहेत. एवढे प्रयत्न करूनही केवळ ४५ टक्केच करवसुली झाली असल्याने आता नगरपालिकेने मालमत्ता सील करण्याच्या कारवाईला सुरुवात केली आहे.
एका खासगी मालकांच्या इमारतीवर भारती सेल्युलर कंपनीचा मोबाईल टॉवर असून, करभरणा न केल्याने हा टॉवर सील करण्यात आला आहे. पुढील काळात काही खासगी मालमत्ताजप्तीच्या व सील करण्याची कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी भूमकर यांनी सांगितले. (वार्ताहर)