होळीला जपा सामाजिक बांधिलकी

By Admin | Updated: March 23, 2016 01:27 IST2016-03-23T01:27:24+5:302016-03-23T01:27:24+5:30

फाल्गुन शुद्ध पौर्णिमेच्या मुहूर्तावर साजरा केला जाणारा सण म्हणजे होळी. होळीच्या मुहूर्तावर शेणाच्या गोवऱ्या, झाडाच्या फांद्या पेटवून अग्निदेवतेची पूजा केली जाते.

Japa Social commitment to Holi | होळीला जपा सामाजिक बांधिलकी

होळीला जपा सामाजिक बांधिलकी

पुणे : फाल्गुन शुद्ध पौर्णिमेच्या मुहूर्तावर साजरा केला जाणारा सण म्हणजे होळी. होळीच्या मुहूर्तावर शेणाच्या गोवऱ्या, झाडाच्या फांद्या पेटवून अग्निदेवतेची पूजा केली जाते. शहरात विविध ठिकाणी होळी आणि धूलिवंदनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. राज्यातील दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचे, पाणीबचतीचे आवाहन करण्यात आले आहे.
होळीच्या दिवशी अग्नीला फेऱ्या मारून नारळ फोडून पूजा केली जाते. अग्नीला शांत करण्यासाठी ही पूजा केली जाते, असे मानले जाते. महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात, आणि पेटलेल्या होळीभोवती ‘बोंबा’ मारत लोक प्रदक्षिणा घालतात. या दिवशी घरोघरी पुरणपोळीचा बेत आखला जातो.
दुसऱ्या दिवशी धूलिवंदन असल्याने विविधरंगी पिचकाऱ्या, फुगे, बंदूक यांच्या खरेदीसाठी बाजारात लगबग सुरूआहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदा पाण्याची नासाडी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तीव्र पाणीटंचाई असताना होळी व रंगपंचमी शास्त्रापुरतीच साजरी करण्याचे आवाहन पंचांगकर्त्यांनी केले आहे. कालनिर्णय, दाते पंचांग, जन्मभूमी पंचांग, महाराष्ट्रीय पंचांग व लाटकर पंचांग यांनी एकत्र येऊन होळीसंदर्भात आवाहन केले आहे.
साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराने यंदाची होळी दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना पुरणपोळीचे भोजन देऊन साजरी केली. या वेळी अवघ्या ५ गोवऱ्यांची होळी पेटवली गेली. याप्रसंगी महापौर प्रशांत जगताप म्हणाले, ‘पुण्यातील सर्व मंडळे, दानशूर व्यक्तींनी दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचा हा आदर्श समोर ठेवायला हवा. होळीची पोळी दुष्काळग्रस्तांसह खाल्ल्यास त्याची गोडी आणखी वाढेल.’
रवींद्र माळवदकर म्हणाले, ‘बळीराजा सलग तीन वर्षांच्या दुष्काळामुळे अडचणीत आला आहे. त्यांची मुले पुण्यात शिकायला आहेत. त्यांना होळीच्या निमित्ताने पुरणपोळीच्या भोजनाचा आस्वाद देण्यातील आनंद काही वेगळाच आहे.’
यंदा होळीच्या निमित्ताने बायोस्फिअर्स या संस्थेच्या वतीने ‘हटवा तण, वाचवा वन’ या उद्दिष्टाखाली तण-होळी साजरी करण्याचा संकल्प केला आहे. परदेशी तणांमुळे पर्यावरणाचे, आर्थिक व्यवस्थेचे आणि आरोग्यविषयक धोके लक्षात घेऊन निसर्गसंवर्धनासाठी ही अनोखी होळी साजरी केली जाणार आहे.

Web Title: Japa Social commitment to Holi