टंचाईग्रस्त गावांना अखेर ‘जनाई’चे पाणी

By Admin | Updated: September 7, 2016 01:35 IST2016-09-07T01:35:56+5:302016-09-07T01:35:56+5:30

सलग ४ वर्ष टंचाईचा सामना करणाऱ्या सुपे परगण्यातील टंचाईग्रस्त गावांना अखेर जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेतून पाणी देण्यास मंगळवारपासून सुरुवात करण्यात आली.

'Jana'i water finally gets scarcity-hit villages | टंचाईग्रस्त गावांना अखेर ‘जनाई’चे पाणी

टंचाईग्रस्त गावांना अखेर ‘जनाई’चे पाणी

बारामती : सलग ४ वर्ष टंचाईचा सामना करणाऱ्या सुपे परगण्यातील टंचाईग्रस्त गावांना अखेर जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेतून पाणी देण्यास मंगळवारपासून सुरुवात करण्यात आली.
या योजनेतून पाणी देण्याची मागणी सातत्याने केली जात होती. कालवा समितीच्या बैठकीत देखील हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. मात्र, पाणी उपलब्ध केले नव्हते. सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनीच आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर तातडीने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. तर जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या आदेशानंतर प्रशासन हालले.
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे बारामती, दौंड, इंदापूरच्या जिरायती भागास पाणी देण्यास मान्यता देण्यात आली होती. मात्र, अंमलबजावणी करण्यात आली नाही, असे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक दिलीप खैरे यांनी अधीक्षक अभियंत्यांच्या निदर्शनास आणले होते.
या संदर्भात जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांना देखील कालवा समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे पाणी सोडण्याचे नियोजन होत नसल्याचे निदर्शनास आणले होते. शिवतारे यांनी आपल्या विभागाच्या सचिवांना तातडीने विषय मार्गी लावावा, अन्यथा दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई करावी, असे आदेश दिले. त्यानंतर आज सायंकाळपासूनच जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेतून पाणी देण्यास सुरुवात झाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'Jana'i water finally gets scarcity-hit villages