जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे वरवंडनगरीत स्वागत   

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 09:57 PM2018-07-11T21:57:06+5:302018-07-11T22:00:13+5:30

ठिकठिकाणी स्वागतकमानी, रांगोळीच्या पायघड्या व घरासमोर रांगोळी काढून जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. 

jagadguru Sant Tukaram Maharaj's Palkhi in varvand | जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे वरवंडनगरीत स्वागत   

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे वरवंडनगरीत स्वागत   

Next
ठळक मुद्दे स्वच्छतेचा संदेश, निर्मलग्राम, शेतकरी वाचवा, प्लॅस्टिकमुक्ती, डिजीटल इंडिया, बेटी बचाव हे संदेश देणारे फलक

वरवंड : टाळमृदंगाच्या निनादात व विठूनामाच्या गजरात जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात वरवंडनगरीत स्वागत करण्यात आले.
श्रीसंत तुकाराम महाराज पालखी सोहळा यवतचा मुक्काम आटोपून बुधवारी (दि.११ जुलै) सकाळी मार्गस्थ झाला. दुपारी भांडगाव येथे न्याहारी उरकून चारच्या सुमारास चौफुला येथे पोहोचला. विश्रांती घेऊन व भक्तांचे दर्शन झाल्यानंतर पालखी सोहळा वरवंडच्या दिशेने मार्गस्थ झाला. 
पालखीचे स्वागत करण्यासाठी ग्रामस्थ गावाच्या वेशीवर मोठ्या संख्यने हजेरी लावली होती. टाळमृदंगाच्या गजरात भक्तिमय वातावरणात पालखीचे स्वागत केले. ठिकठिकाणी स्वागतकमानी, रांगोळीच्या पायघड्या व घरासमोर रांगोळी काढून स्वागत करण्यात आले. 
मंदिराभोवती रिंगण केल्यानंतर ग्रामस्थांनी पालखी स्वत:च्या खाद्यावर उचलून मंदिरामध्ये ठेवली.  नैवेद्य ,आरती दाखविण्यात आल्यानंतर विणेकऱ्यांनी दर्शन घेतले व नंतर भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात आले. मंदिरामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. ग्रामस्थांच्या वतीने जेवणाची व्यवस्था वसतिगृहाच्या मैदानावर करण्यात आली होती. स्वच्छतेचा संदेश, निर्मलग्राम, शेतकरी वाचवा, प्लॅस्टिकमुक्ती, डिजीटल इंडिया, बेटी बचाव हे संदेश देणारे फलक लावण्यात आले होते. याकडे लक्ष वेधले गेले. तसेच, प्रशासनाच्या वतीने मंदिर परिसरामध्ये आपत्ती व्यस्थापन कक्ष व नियत्रण कक्ष स्थापन करण्यात आला होता. 

Web Title: jagadguru Sant Tukaram Maharaj's Palkhi in varvand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.