वाजत गाजत आलेगणराय

By Admin | Updated: August 30, 2014 01:40 IST2014-08-30T01:40:31+5:302014-08-30T01:40:31+5:30

ढोल ताशांच्या गजरात, वरुणाच्या अभिषेकात सर्वांच्याच लाडक्या गणरायाचे शुक्रवारी पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत आगमन झाले

It's been late | वाजत गाजत आलेगणराय

वाजत गाजत आलेगणराय

पिंपरी : ढोल ताशांच्या गजरात, वरुणाच्या अभिषेकात सर्वांच्याच लाडक्या गणरायाचे शुक्रवारी पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत आगमन झाले. शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांबरोबरच घरगुती गणपतीचेही उत्साहात स्वागत करण्यात आले. दुपारी आणि सायंकाळी झालेल्या पावसामुळे गणेशभक्तांची काही वेळ तारांबळ उडाली. अवघी उद्योगनगरी गणेशमय झाली आहे.
अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या गणरायाचे आगमन झाल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. घरगुती गणपतींच्या प्रतिष्ठापनेस सकाळपासूनच सुरुवात झाली. ऐनवेळी धावाधाव नको यासाठी बहुतेक जणांनी दोन दिवस अगोदरच आवडती श्रींची मूर्ती आगाऊ नोंदणी करून ठेवली होती. त्यामुळे गणेशभक्तांसाठी अधिक सोईचे झाले. हातातील पाटावर गणरायाची मूर्ती, डोक्यावर टोपी, सोबत घंटीचा नाद आणि बाप्पांचा जयघोष असे चित्र दिसत होते. लाडक्या ‘श्रीं’ना घरी आणण्यासाठी गणेशभक्त कुटुंबासह जात होते. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेनासा झाला होता.
मुहूर्ताच्या वेळेत बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यासाठी अनेकांची पळापळ सुरू असल्याचेही पहायला मिळाले. आपल्या घरातील बाप्पा आणि त्यांच्या सभोवतालची सजावट अधिकाधिक सुंदर कशी होईल याकडे गणेशभक्तांचे बारकाईने लक्ष होते. बाप्पाला लागणारा हार कसा असावा, बाप्पांचे आवडते पदार्थ, दुर्वा गड्डी, तसेच इतर वस्तूंचीही खरेदी केली जात होती.
बाप्पा येणार म्हटल्यावर वातावरणही प्रसन्न असावे यासाठी घरातील तसेच परिसराचीही स्वच्छता करण्यात आली. अनेकांनी घराला रंगरंगोटीही केली आहे. नवीन वस्त्र परिधान करुन बाप्पांना घरी आणले.
सार्वजनिक मंडळांतील ‘श्रीं’च्या मूर्तींची प्रतिष्ठापना सायंकाळी करण्यात आली. ढोल-ताशाच्या गजरात आगमन झाले. पावसाच्या सरी अंगावर कोसळत असतानाही कार्यकर्त्यांमधील जल्लोष कायम होता. सजविलेल्या ट्रॅक्टरमध्ये ‘श्रीं’ची मूर्ती, फेटे बांधलेले कार्यकर्ते, ढोल-ताशा पथक आणि बाप्पांचा जयघोष अशा वातावरणात सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. पोलिसांच्या मदतीला स्वयंसेवकांची मदत घेण्यात येणार आहे. त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. या स्वयंसेवकांना टी-शर्ट, शिटी, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: It's been late

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.