‘आयटी’तील तरूणी असुरक्षित
By Admin | Updated: January 31, 2017 04:14 IST2017-01-31T04:14:43+5:302017-01-31T04:14:43+5:30
तळवडे येथे महिन्यापूर्वी सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाऱ्या मूळच्या पश्चिम बंगालच्या अंतरा दास या तरुणीचा निर्घृण खून झाला. ही घटना ताजी असताना, हिंजवडी

‘आयटी’तील तरूणी असुरक्षित
पिंपरी : तळवडे येथे महिन्यापूर्वी सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाऱ्या मूळच्या पश्चिम बंगालच्या अंतरा दास या तरुणीचा निर्घृण खून झाला. ही घटना ताजी असताना, हिंजवडी आयटी पार्कमध्ये आयटी अभियंता म्हणून काम करणाऱ्या रसिला राजू ओ पी या तरुणीचा रखवालदाराने गळा आवळून खून केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. आयटी अभियंत्यांची ने-आण करणाऱ्या कॅबचालकाकडून तरी कधी रखवालदाराकडूनच गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडू लागले आहेत. अशा घटना वारंवार घडू लागल्या असून, कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटू लागल्या आहेत.
तळवडे सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क येथे २३ डिसेंबर २०१७ ला रात्री साडेआठच्या सुमारास कंपनीतून बाहेर पडल्यानंतर वाहनाच्या शोधात पायी जात असलेल्या अंतरा दास या तरुणीवर धारदार शस्त्राने आरोपीने हल्ला केला. त्यात ती ठार झाली. या घटनेनंतर आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली वाहन सुविधा सक्षम असते का? त्यांच्या सुरक्षिततेची दक्षता घेतली जाते का, याबद्दल प्रश्न उपस्थित केला जात आहे. हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या नयना पुजारी या तरुणीवर थेरगावातील कॅबचालकाने साथीदारांसह बलात्कार केल्याची घटना खळबळजनक घटना २००९ मध्ये घडली होती. त्या वेळीच आयटी क्षेत्रातील अभियंते, तसेच विशेषत: तरुणींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यानंतर सुभाष सेठी, दर्शन डोंगरे या आयटी अभियंत्यांचेही खून झाले. या घटना विस्मृतीत गेल्या होत्या. अंतरा दास हिचा २३ डिसेंबरला खून झाला. पाठोपाठ २९ जानेवारी २०१७ ला हिंजवडीतील कंपनीत काम करणाऱ्या रसिलाचा गळा आवळून खून करण्यात आला. या घटनांमुळे आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. (प्रतिनिधी)
सुरक्षारक्षक नेमताना दक्षता घेतली जावी
१हिंजवडी आयटी पार्कमधील एका कंपनीत संगणक अभियंता पदावर काम करणाऱ्या रसिला ओ पी या तरुणीचा रखवालदारानेच खून केला. ही घटना गंभीर असून, आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेबद्दल अधिक दक्षता घेणे गरजेचे आहे. अभियंत्यांची ने-आण करणाऱ्या वाहनांवरील चालकांची नेमणूक करताना, त्यांची चारित्र्य पडताळणी केली जाते. पोलिसांकडून व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच त्यांची नेमणूक केली जाते.
२रखवालदारांची नेमणूक खासगी सुरक्षा एजन्सीकडून केली जाते. त्या एजन्सीकडून पडताळणी होते की नाही, हे माहिती नाही. याबाबत निष्काळजीपणा दाखवला जात असेल, तर त्यात सुधारणा घडवून आणण्याचे प्रयत्न केले जातील. आयटी परिसरातील सुरक्षेसंबंधी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचे प्रस्तावित आहे, असे हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष अनिल पटवर्धन यांनी सांगितले.