मृतदेहांची ओळख पटायला लागणार तीन दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:14 IST2021-06-09T04:14:32+5:302021-06-09T04:14:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : उरवडे येथे केमिकल कंपनीच्या आगीत मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख पटविण्यासाठी तीन दिवस लागणार आहेत. या ...

It will take three days for the bodies to be identified | मृतदेहांची ओळख पटायला लागणार तीन दिवस

मृतदेहांची ओळख पटायला लागणार तीन दिवस

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : उरवडे येथे केमिकल कंपनीच्या आगीत मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख पटविण्यासाठी तीन दिवस लागणार आहेत. या घटनेसंदर्भात चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल आल्यानंतर आगीचे कारण स्पष्ट होणार असून, त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.

उरवडे येथे एसक्यूएस ॲक्वा कंपनीला आग लागून १७ जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळी मंगळवारी वळसे- पाटील यांनी भेट दिली. ते म्हणाले की, मृतदेह ओळखणेदेखील अवघड झाले असल्याने या सर्वांची डीएनए चाचणी केली जाणार आहे. यासाठी तीन दिवस लागू शकतात. त्यानंतर मृतदेह ताब्यात द्यायचे की, एकत्रित अंत्यसंस्कार करायचे? याचा निर्णय घेतला जाईल. खासगी औद्योगिक वसाहतीतल्या या कंपनीत ज्वलनशील वस्तू असल्यामुळे १८ जणांचा मृत्यू झाला आहे. आग कशामुळे लागली? यासाठी समिती नेमली आहे. याचा अहवाल आजच प्राप्त होऊ शकतो. त्यानंतर कारण स्पष्ट होऊ शकेल आणि त्यानंतर प्राथमिक अहवाल प्राप्त झाला की गुन्हा दाखल केला जाईल. या कंपनीत क्लोरिनडाय ऑक्साईड हे पाणी शुद्धीकरणाच्या गोळ्या बनवण्यासाठी वापरले जात होते. त्याचे पॅकिंग होत असताना ही आग लागली. उद्योगांच्या फायर ऑडिटसंदर्भात उद्योगमंत्र्यांशी चर्चा करून त्यासंदर्भात माहिती घेतली जाईल.

दरम्यान, एसक्सूएस ॲक्वा कंपनीला केवळ क्लोरोक्निनच्या गोळ्यांच्या पॅकिंगची आणि पावडर तयार करण्याची परवानगी होती. तरीही सॅनिटायझर प्लॅस्टिक बॉटलमध्ये भरण्याचे काम कंपनीत होत होते. हे अतिशय धोकादायक रसायन असल्यामुळेच या ठिकाणी ही मोठी घटना घडली आणि त्यात १८ जणांना जीव गमवावा लागला. याप्रकरणी कंपनी मालक निकुंज शहा त्याच्यावर सायंकाळी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे-पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.

कामगार राज्यमंत्री आमदार बच्चू कडू, खासदार सुप्रिया सुळे यांनी घटनास्थळी भेट दिली.

Web Title: It will take three days for the bodies to be identified

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.