‘तो’ कदमच होता!
By Admin | Updated: January 8, 2015 23:08 IST2015-01-08T23:08:04+5:302015-01-08T23:08:04+5:30
संगणक अभियंता नयना पुजारी खून खटल्यातील आरोपी विश्वास हिंदुराव कदम याची येरवडा कारगृहात ओळख परेड घेण्यात आली,

‘तो’ कदमच होता!
पुणे : संगणक अभियंता नयना पुजारी खून खटल्यातील आरोपी विश्वास हिंदुराव कदम याची येरवडा कारगृहात ओळख परेड घेण्यात आली, तेव्हा तीन साक्षीदारांनी त्याला ओळखले होते. वढू फाट्याजवळून तिघे मित्र त्यांच्या तवेरा मोटारीतून जात असताना तेथे उभ्या असलेल्या इंडीका कारने अपरडीपर दिल्याने त्यापैकी एक जण तेथे गेला . तेव्हा कदम एका स्त्रीबरोबर मागील बाजूला बसला होता, अशी साक्ष त्या साक्षीदाराने दिली होती. या ओळख परेडचा आपण पंचनामा केला होता, अशी साक्ष विशेष कार्यकारी न्यायदंडाधिकाऱ्यांनी विशेष न्यायाधीश साधना शिंदे यांच्या न्यायालयात दिली. या प्रकरणाची बुधवारी सुनावणी झाली.
विशेष कार्यकारी न्यायदंडाधिकारी डी. एम. बनसोडे यांची साक्ष न्यायालयात नोंदविण्यात आली. बनसोडे यांनी कदम याच्या ओळख परेडचा पंचनामा केला होता. १० जानेवारी २०१० रोजी ओळख परेड घेण्यात आली होती. बनसोडे यांची सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी साक्ष घेतली.
येरवडा तुरुंगात इतर आरोपींसह कदम याला ओळख परेडसाठी उभे करण्यात आले होते. या आरोपींमधून कदमला एका व्यक्तीने ओळखले. घटनेच्या दिवशी वढू फाट्याजवळ आरोपींनी त्यांची इंडिका कार उभी केली होती. त्याच वेळी तिघे मित्र त्यांच्या तवेरा गाडीतून तेथून जात होते. इंडिका कारने अपरडीपर दिल्याने, त्या मित्रांपैकी एक जण कारजवळ गेला तेव्हा आरोपींनी कारमध्ये एका महिलेला आणल्याचे सांगितले. त्यानंतर त्या व्यक्तीने मागील बाजूस पाहिले तेव्हा कदम हा एका महिलेबरोबर बसलेला दिसला. अशा रीतीने त्याने ओळखले होते. कदमच्या ओळख परेडमध्ये ओळखण्यात आल्याचा पंचनामा आपण केला होता; तसेच त्याचे सर्टिफिकेट दिले होते, असे बनसोडे यांनी साक्षीत सांगितले. (प्रतिनिधी)
राऊतला हवी जन्मकुंडली
या खटल्यातील मुख्य आरोपी योगेश राऊत हा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करीत असल्याने त्याने त्याची जन्मकुंडली येरवडा कारागृहात मागवली आहे. ती राऊतला देण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून राऊतच्या भावाने न्यायालयात अर्ज केला होता. यावर न्यायालयाने तो परिक्षा देणार आहे का अशी विचारणा केली. मात्र परिक्षा देणार नसल्याने परवानगी देता येणार नाही. ‘जेल मॅन्युअल’नुसार त्याबाबतचा तुरूंग अधिकाऱ्यांना विचारणा करावे असे न्यायालयाने नमूद केले.