मोडून पडला संसार तरी...
By Admin | Updated: March 29, 2017 00:26 IST2017-03-29T00:26:04+5:302017-03-29T00:26:04+5:30
येथे पाच झोपड्यांना आग लागून घरातील संसारोपयोगी साहित्य व रोख जळून खाक झाले. या आगीत नऊ लाख रुपयांचे नुकसान झाले

मोडून पडला संसार तरी...
दावडी : येथे पाच झोपड्यांना आग लागून घरातील संसारोपयोगी साहित्य व रोख जळून खाक झाले. या आगीत नऊ लाख रुपयांचे नुकसान झाले असून क्षणात होत्याचं नव्हतं झालं आहे.
दावडी येथील गव्हाणेवस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत नानुबाई पांडुरंग जाधव, दीपक पांडुरंग जाधव, सोमनाथ पांडुरंग जाधव व चिमा बबन भालेराव गेल्या १८ वर्षांपासून येथे झोपड्या बांधून राहत होते. शेती करणे, ज्वारी-बाजरी राखण्याची कामे घेणे असे हे कुंटुबकाम करून आपला उदरनिर्वाह करीत होते. सोमवारी (दि. २७) सर्व जण जेवण करून रात्री १० वाजता झोपले असता अचानक झोपडीला आग लागली.
झोपडीत नवीन घरकामांसाठी वडिलांनी दिलेले सात लाख रुपये नानुबाई जाधव झोपडीतील ठेवलेल्या साडीत गुंडाळून ठेवले होते. मात्र आगीने रौद्र रुप धारण केल्यामुळे साडीत गुंडाळून ठेवलेले पैसे बाहेर काढता आले नाहीत. तसेच बाजरीच्या धान्याची पोती, घरात ठेवलेला एक तोळ्याचा सोन्याचा दागिना, कपडे, भांडी, लहान मुलांची शाळेची दप्तरे तसेच संसारोपयोगी वस्तू या आगीत जळून खाक झाल्या असून एकूण ९ लाख रुपयांचे नुकसान या आगीत झाले आहे. अनिता जाधव या महिलेच्या पाठीला झोपडीत झोपलेल्या मुलांना बाहेर काढताना भाजले आहे.
या आगीत नुकसान झालेल्या वस्तूंचा पंचनामा तलाठी डी. एम. खोमणे, कोतवाल देवेंद्र ओव्हाळ यांची केला आहे. खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव, पोलीस उपनिरीक्षक गणेश म्हस्के यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दरम्यान, खेडचे आमदार सुरेशभाऊ गोरे यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन जखमी महिलेची विचारपूस करून तातडीची मदत म्हणून ११ हजार रुपये रोख या कुटुंबाला दिले. या कुटुंबाला पुनर्वसनासाठी मदत केली जाईल, असे आमदार गोरे यांनी सांगितले. जिल्हा परिषद सदस्या निर्मलाताई पानसरे, तसेच खेड पंचायत समिती सभापती सुभद्रा शिंदे यांनीही घटनास्थळी जाऊन या कुटुंबाला धीर दिला. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य किरण मांजरे, निमगावचे सरपंच अमर शिंदे-पाटील, विजयसिंह शिंदे आदींनी भेट दिली.
अर्ध्या तासात सारे नष्ट
झोपडी गवत व ताटांची असल्यामुळे तसेच रात्री वारा सुटल्यामुळे आग क्षणात सगळीकडे पसरली.
झोपड्या एकमेकांना लागून असल्यामुळे अर्धा तासात जळून खाक झाल्या. झोपडीतील महिला-पुरुष मंडळींनी आरडाओरडा केला.
जवळपास राहणाऱ्या नागरिकांनी आगीच्या ठिकाणी धाव घेतली. मात्र आग विझवण्यासाठी जवळपास पाणी नसल्यामुळे आग विझवता आली नाही.