आयटी ‘वारकरी’ दत्तक घेणार ‘शाळकरी’

By Admin | Updated: July 5, 2015 01:07 IST2015-07-05T01:07:07+5:302015-07-05T01:07:07+5:30

माहिती-तंत्रज्ञानाच्या महाजालात असतानाही विठ्ठलाच्या ओढीने वारीत सहभागी होणारे आयटीतले ‘वारकरी’ आता सामाजिक बांधिलकीचा वसाही घेऊ पाहत आहेत.

IT 'Warkari' to adopt 'schoolboy' | आयटी ‘वारकरी’ दत्तक घेणार ‘शाळकरी’

आयटी ‘वारकरी’ दत्तक घेणार ‘शाळकरी’

पराग पोतदार, पुणे
माहिती-तंत्रज्ञानाच्या महाजालात असतानाही विठ्ठलाच्या ओढीने वारीत सहभागी होणारे आयटीतले ‘वारकरी’ आता सामाजिक बांधिलकीचा वसाही घेऊ पाहत आहेत. यंदा वारीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याबरोबरच हे सर्व जण मिळून आश्रमशाळांतील १५ हून अधिक शाळकरी मुलांना दत्तक घेणार आहेत. सांस्कृतिकनगरी म्हणून ओळख असणारी पुण्यनगरी ही
गेल्या दशकामध्ये आयटीनगरी बनलेली आहे.
पुण्यामध्ये २०० हून अधिक आयटी कंपन्या असून हजारो तरुण मुले या आयटी कंपन्यांतून काम करीत आहेत. या साऱ्यांना आळंदीहून पंढरपुराकडे जाणाऱ्या वारीची ओढ निर्माण झाली आणि त्यांनी त्यात सहभागी होण्यासाठी ‘आयटी दिंडी’ स्थापन केली असून त्यात सहभागी होणाऱ्या आयटी मित्रांची संख्या झपाट्याने वाढते आहे. त्या पार्श्वभूमीवर आयटीतील प्रमुख आयोजकांनी त्याला सामाजिक बांधिलकीचेही स्वरूप द्यायचे ठरवले आहे.
दरवर्षी काही ना काही विधायक उपक्रमांतून वारीच्या काळामध्ये वारकऱ्यांना मदत दिली जाते. परंतु त्यानंतरही बऱ्याच प्रमाणात रक्कम शिल्लक राहत असे. हे आयटी मित्रांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी या वर्षापासून आश्रमशाळांच्या १५ मुलांना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याद्वारे या सर्व गरीब, गरजू परंतु होतकरू व हुशार मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च हे आयटीतले वारकरी उचलणार आहेत. गेल्या वर्षी त्यांनी फासेपारध्यांच्या मुलांना गरजेच्या वस्तू भेट दिल्या होत्या.
लाखो वारकरी जो आनंद घेत वारीमध्ये सहभागी होतात त्यात आपणही सहभागी व्हावे, या भावनेतून आयटी दिंडी दरवर्षी आळंदीहून निघते. दरवर्षी एक सामाजिक संदेश देण्याचा त्यांचा प्रयास असतो. यापूर्वी वृक्षसंवर्धन व मुलगी वाचवा हा संदेश दिलेला होता.
या वर्षी स्वच्छता अभियानाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेचा आग्रह-विठोबाचा निग्रह असा संदेश असणाऱ्या टोप्या वारकऱ्यांना ते भेट देणार आहेत व स्वच्छतेचा जागर मांडणार आहेत.

वारकऱ्यांमधील अनेक जण आपल्या मुलांना आयटीत नोकरी मिळावी, म्हणून आयटी दिंडीतील लोकांकडे त्यांचे बायोडाटा आणून देतात. त्यामुळे इंग्रजी संभाषणापासून ते नोकरी मिळवून देण्यापर्यंत हे सारे त्यांना मदत करतात. त्याशिवाय वारी या आपल्या सांस्कृतिक व आध्यात्मिक संचिताचे आॅनलाइन डॉक्युमेंटेशन व वारीतील वारकऱ्यांचा डाटाबेस करण्याची कल्पना मनात आहे, असे आयटी दिंडीचे प्रमुख समन्वयक प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले.

Web Title: IT 'Warkari' to adopt 'schoolboy'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.