सोसायटीतील कचरा उचलणे बंद करणे अन्यायकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:17 IST2021-02-05T05:17:19+5:302021-02-05T05:17:19+5:30
पुणे : जैव कचरा विल्हेवाट प्रकल्प नसलेल्या ५० सदनिकांपेक्षा जास्त सदनिका असलेल्या सोसायटीतील कचरा उचलणे बंद करण्याचा निर्णय महापालिकेने ...

सोसायटीतील कचरा उचलणे बंद करणे अन्यायकारक
पुणे : जैव कचरा विल्हेवाट प्रकल्प नसलेल्या ५० सदनिकांपेक्षा जास्त सदनिका असलेल्या सोसायटीतील कचरा उचलणे बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे़ मात्र हा निर्णय अतिशय अन्यायकारक आहे. पुणे शहरामध्ये अत्यंत तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे़ त्यामुळे याबाबत योग्य धोरण तयार करून, सदर निर्णय सरसटक सर्व सोसायट्यांना लागू करू नये, अशी मागणी नगरसेवक प्रवीण चोरबेले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे़
पुणे शहरात सन २०१५ नंतर नवीन इमारती अथवा नवीन सोसायटी निर्माण होणेपूर्वी ज्यावेळी संबंधित विकसकास सोसायटीमध्येच जैव विघटनशील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची अट पुणे मनपाच्या बांधकाम विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र घेतेवेळी घातली़ परंतु, पुणे शहरामध्ये अनेक सोसायट्यांची निर्मिती सन १९८०, १९९०, २००० व २०१० मध्ये झालेली आहे. त्या वेळी कचरा जिरवण्याची अथवा विल्हेवाट लावण्याची कोणतीही अट नव्हती. त्यामुळे अशा सोसायट्यांमध्ये पुरेशी रिकामी जागा सोडलेली नसल्याने जैव विघटनशील कचऱ्याची विल्हेवाट लावणेकरिता मुबलक जागा उपलब्ध नसल्याच्या मुद्द्याकडे त्यांनी लक्ष वेधत ही दंडात्मक कारवाई त्वरित थांबवावी व सर्व सोसायट्यांमधील कचरा उचलण्यात यावा, अशी मागणी केली आहे़