आचारसंहितेत ध्वजवंदन शक्य, भाषणावर नजर
By Admin | Updated: January 25, 2017 01:41 IST2017-01-25T01:41:21+5:302017-01-25T01:41:21+5:30
आचारसंहितेदरम्यान साजऱ्या होणाऱ्या प्रजासत्ताकदिनी ध्वजवंदन करण्याची मुभा पदाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.

आचारसंहितेत ध्वजवंदन शक्य, भाषणावर नजर
कान्हूर मेसाई : आचारसंहितेदरम्यान साजऱ्या होणाऱ्या प्रजासत्ताकदिनी ध्वजवंदन करण्याची मुभा पदाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, पंचायत समिती सभापती, नगर पंचायत समिती सभापती, नगर परिषदांचे नगराध्यक्ष व ग्रामपंचायतीमध्ये सरपंचाच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आयोगाची हरकत नाही.
मात्र, अशा कार्यक्रमाच्या नेहमीच्या स्थळांत कुठलाच बदल करता येणार नाही. या दिनाच्या औचित्याने समारंभात करावयाची भाषणे, स्वातंत्र्य मिळविण्यासाठी बलिदान केलेल्या हुतात्म्यांच्या उल्लेख व देशाचा गौरव या पुरतीच मर्यादित ठेवता येतील.
कोणत्याही परिस्थितीत या समारंभात निवडणूक प्रचाराला बळ देणारे भाषण करता येणार नाही. या सूचना महाराष्ट्र दिन, सद्भावना दिनासाठीही लागू करण्यात आल्या आहेत.
आचारसंहितेच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेमधील सर्वसाधारण सभा, विषय समितीसह विविध समितीच्या बैठकी ज्या कायद्यानुसार घेणे बंधनकारक आहे त्या मात्र घेता येणार आहेत.
तथापि, नियुक्त्या, अनुदान, कर्ज अथवा आर्थिक सहाय्य मंजूर करता येणार नाही. नवीन कामास मंजुरीदेखील देता
येणार नाही. मतदारांवर प्रभाव पडेल
असे कोणतेही निर्णय घेता येणार
नाहीत. (वार्ताहर)