जिल्हा परिषद शाळांतील गणवेश बदलणे अशक्य
By Admin | Updated: May 18, 2015 05:31 IST2015-05-18T05:31:35+5:302015-05-18T05:31:35+5:30
जिल्हा परिषद शाळेतील मुलांना यंदाही पांढरा शर्ट, खाकी पॅन्ट तर मुलींना निळा स्कर्ट व पांढरा शर्ट हाच गणवेश घालावा लागणार आहे.

जिल्हा परिषद शाळांतील गणवेश बदलणे अशक्य
पुणे : जिल्हा परिषद शाळेतील मुलांना यंदाही पांढरा शर्ट, खाकी पॅन्ट तर मुलींना निळा स्कर्ट व पांढरा शर्ट हाच गणवेश घालावा लागणार आहे. मात्र अनुदानप्राप्त ९८ हजार विद्यार्थ्यांना टाय, बूट व सॉक्स देण्यात येणार आहे.
वर्षानुवर्षे तोच तो गणवेश घालून कंटाळलेल्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षात रंगीबेरंगी गणवेश देण्याचा प्रयत्न जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा होता. तसा प्रस्ताव करून स्थायी समितीच्या बैठकीत त्याला मान्यताही घेतली होती.
आकर्षक रंगसंगतीचे
गणवेश दिले तर विद्यार्थ्यांचा उत्साह वाढून शाळेची आवड निर्माण होईल, याचा विचार करून गणवेश बदलण्याचा निर्णय झाला होता. यासाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व शिक्षण विभागाचे सभापती शुक्राचार्य वांजळे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शेख यांनी शासनाच्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चाही केली होती. तसे शिक्षण विभागाने शासनाला पत्र पाठवून कळविले होते.
मात्र, गणवेश, त्याचा रंग बदलण्याचा सर्वाधिकार शाळा व्यवस्थापन समितीस आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या सर्वसाधरण सभेत हा निर्णय करून शासनाकडे तसा ठराव पाठवून त्यांची परवानगी घेणे गरजेचे आहे.
या पार्श्वभूमीवर उरलेल्या कालावधीत ही सर्व प्रोसेस करून कापड उपलब्ध करून ९८ हजार विद्यार्थ्यांना गणवेश पुरवणे हे जिकिरीचे काम आहे. त्यामुळे यंदा तरी ते अशक्य दिसत आहे. (प्रतिनिधी)