सर्वांसाठीच आदर्शवत ठरला ‘ती’चा गणपती
By Admin | Updated: September 10, 2014 06:17 IST2014-09-10T06:17:17+5:302014-09-10T06:17:17+5:30
ढोल ताशाचा गजर... कृती-निर्मिती-संस्कृतीचा जागर... महिलांचा सन्मान अन् विविध सामाजिक संदेश देत सोमवारी ‘लोकमत सखी

सर्वांसाठीच आदर्शवत ठरला ‘ती’चा गणपती
पुणे : ढोल ताशाचा गजर... कृती-निर्मिती-संस्कृतीचा जागर... महिलांचा सन्मान अन् विविध सामाजिक संदेश देत सोमवारी ‘लोकमत सखी गणेश मंडळा’च्या ‘ती’च्या गणपतीला उत्साही, जल्लोषपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. शाडूपासून तयार केलेल्या मूर्तीचे विसर्जन लोकमत कार्यालयातील कृत्रिम हौदात करून महिला मंडळाने एक आदर्शही घालून दिला.
स्त्रीशक्तीचा सन्मान करण्यासाठी ‘लोकमत’ने ‘आपले बाप्पा’ या उपक्रमांतर्गत या वर्षी ‘लोकमत महिला गणेश मंडळा’ची स्थापना केली. कार्यालयातील सर्व महिलांचा या मंडळात समावेश आहे. गणरायाचे स्वागत करण्यापासून ते त्याला निरोप देईपर्यंतचे सर्व नियोजन महिलांनीच केले. गणेशोत्सवातील पहिल्या दिवसापासून दोन्ही वेळची आरती महिल्यांच्या हस्ते करण्यात आली. बाप्पाला निरोप देतानाही महिलांनीच पुढाकार घेतला. सोमवारी सकाळी मंडळातील महिलांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर लॉ कॉलेज रस्त्यावरील कार्यालयापासून खास तयार करण्यात आलेल्या रथात ‘ती’च्या गणपतीची मिरवणूक निघाली. मिरवणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या रथावर स्त्री-शक्तीचा जागर करण्यात आला. झाशीची राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, मदर तेरेसा, या थोर महिलांसह विविध क्षेत्रांत आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविलेल्या महिलांची छायाचित्रे रथावर झळकत होती.
मंडळाच्या सर्व महिला डोक्यावर भगव्या रंगाचे फेटे घालून पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे मिरवणुकीचा डौल काही निराळाच होता. शिवगर्जना ढोल-ताशा पथकाच्या दमदार वादनाने मिरवणुकीच्या वैभवात आणखीच भर पडली. हातात लोकमतचे ध्वज, पर्यावरण रक्षण, कृती-निर्मिती-संस्कृतीचा जागर करणारे फलक मिरवणुकीत लक्ष वेधून घेत होते. लोकमत कार्यालयापासून निघालेली ही मिरवणूक एसएनडीटी चौकातून प्रभात रस्त्यावर आली. महिलांकडून गणपत्ती बाप्पा मोरयाचा जयघोष सुरूच होता. अत्यंत मंगलमयी वातावरणात मिरवणूक पुढे जात होती. ढोल-ताशा पथकाच्या गजराने आसमंत दुमदुमून गेला होता. वाहतुकीला अडथळा न होऊ देता, गणेशोत्सवातील संस्कृती व मर्यादांचे भान ठेवून ‘ती’च्या गणपतीची मिरवणूक पुणेकरांना आकर्षित करीत होती.
प्रभात रस्त्यावरून मिरवणूक पुढे राष्ट्रीय संग्रहालयाच्या चौकातून पुन्हा कार्यालयाकडे वळली. लॉ कॉलेज रस्त्याने पुन्हा लोकमत कार्यालयात आली. गणेशोत्सवात सुरुवातीपासून पर्यावरण रक्षणाचे आवाहन ‘लोकमत’र्फे करण्यात आले. तसेच विसर्जनही कृत्रिम हौदात करण्याबाबत जनजागृती करण्यात आली. (प्रतिनिधी)