It is estimated that the fire was caused by an AC duct | ‘एसी डक्ट’मुळे आग भडकल्याचा अंदाज

‘एसी डक्ट’मुळे आग भडकल्याचा अंदाज

पुणे : सिरम इन्स्टिट्यूटमध्ये निर्माणाधीन असलेल्या इमारतीत एकाच वेळी २ ते ३ कंपन्यांची वेगवेगळी कामे सुरु होती. त्यात ‘एसी डक्ट’चेही काम केले जात होते. त्यातूनच आग पसरल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या आगीत दोन्ही मजल्यावरील केबीन, पाटिर्शन, वायरी, दरवाजाचे कुशन असे सर्व साहित्य जळून खाक झाले.

वेळेत पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या हडपसर येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी इमारतीमधील सहा जणांना सुखरूप बाहेर काढले. त्यामुळे जीवीतहानीचे प्रमाण कमी झाले.

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, आगीचे वृत्त समजताच हडपसर व कोंढवा येथील गाड्या सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचल्या. तोपर्यंत आग सर्वत्र पसरु लागली होती. या इमारतीतील दालनात पार्टिशन तयार करणे, दरवाजांना कुशन लावणे, केबीन तयार करणे अशी कामे वेगवेगळ्या २ ते ३ कंपन्यांमार्फत केली जात होती. छताचे पीओपी करण्याचे कामही सुरु होते. तसेच एसी डक्टचे काम सुरु होते. हे एसी डक्ट सर्व मजल्यावर फिरवले जाते. त्यात नेमकी पहिली आग कोठे लागली. ते अद्याप समोर आलेले नाही.

आग लागल्याने फर्निचरच्या साहित्याने पटकन पेट घेतला. दरवाजांना कुशन लावले असल्याने तीही पेटली. धुर बाहेर जाण्यास जागा नसल्याने आग आतमध्येच धुमसत राहिली. एसी डक्टमुळे ही आग चौथ्या व पाचव्या मजल्यावर वेगाने पसरली. अग्निशमन दलाने खिडक्यांची तावदाने फोडून धुराला बाहेर वाट करुन दिल्यानंतर आग विझविण्यास सुरुवात झाली. सुमारे २ तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मि‌‌ळाले. आग विझविल्यानंतर आतमध्ये जाऊन पाहणी केल्यानंतर वरच्या मजल्यावर ५ जणांचे मृतदेह आढळले. ते पूर्णपणे भाजले होते. धुरामुळे कोणालाही काही दिसत नव्हते. हे कामगार त्याच मजल्यावर काम करीत असल्याने त्यांना बाहेर जाण्याचा दरवाजा दिसला नसावा. धुरामुळे गुदमरुन त्यांचा आतच मृत्यू झाला, असा प्राथमिक अंदाज आहे.

-------------

आंतरराष्ट्रीय संस्थेत दुर्लक्ष?

एखाद्या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यावर आगीपासून सरंक्षण करणारी यंत्रणा सक्रिय केली जाते. मात्र, इमारतीत काम सुरु असताना काम करणारे कामगार कसे काम करतात, अशा संभाव्य दुर्घटना उद्भवल्यास काय काळजी घ्यावी, याची कोणतीही खबरदारी घेतली जात नाही. मात्र ‘सिरम’सारख्या आंतरराष्ट्रीय कंपनीतही अशी घटना घडावी, या बद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अशा दुर्घटना यापूर्वीही घडल्या आहेत. त्यामुळे निर्माणधीन महत्त्वाच्या प्रकल्पातील सुरक्षा उपायांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: It is estimated that the fire was caused by an AC duct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.