विकासाच्या मुद्यावर मतदारांपुढे जाणार
By Admin | Updated: February 15, 2017 02:36 IST2017-02-15T02:36:24+5:302017-02-15T02:36:24+5:30
डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर राज्यघटनेचे पालन करण्याची शपथ घेऊन काँग्रेसच्या सर्व उमेदवारांनी आपल्या प्रचाराला सुरुवात

विकासाच्या मुद्यावर मतदारांपुढे जाणार
पुणे : डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर राज्यघटनेचे पालन करण्याची शपथ घेऊन काँग्रेसच्या सर्व उमेदवारांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे़ काँग्रेसने आजवर केलेली कामे आणि भाजप सरकार लोकांच्या डोळ्यात करीत असलेली धूळफेक हे मतदारांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असून विकासाच्या मुद्द्यावरच काँग्रेस मतदारांसमोर जाणार असल्याचे काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अॅड़ अभय छाजेड यांनी सांगितले़ काँग्रेसने २१ कलमी वचननामा प्रसिद्ध केला असून तो जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे़ उमेदवारांचा हाऊस टू हाऊस प्रचार सुरू असून त्यातून १०० टक्के मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे़ काँग्रेसने केंद्र सरकारच्या माध्यमातून पुणे शहरासाठी जवळपास अडीच हजार कोटी रुपये व आघाडी सरकारकडून पाचशे कोटी रुपये आणले होते़ गेल्या अडीच वर्षात भाजपा सरकारने पुणे शहरासाठी एकही पैसा आणलेला नाही, हे पुणेकरांना जाणवून देणार आहोत़ काँग्रेसच्या ज्या योजनांना भाजपाने विरोधी पक्षात असताना विरोध केला होता़ त्या रोजगार हमी योजना, आधार कार्ड या योजनांचाच भाजपा आता प्रचारात वापरत असल्याचे लोकांना दाखवून देण्याचा प्रयत्न असेल़ काँग्रेसच्याच योजना भाजपा सरकारने नवीन पॅकेजिंग करून त्यात सादर केल्या आहेत़ आजही त्यांना महापालिकेच्या निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा लागत आहे़ यावरून त्यांना आपल्या कामावर नाही तर केवळ पंतप्रधानांच्या नावावर मत मागत आहेत़ त्यांच्याकडे मत मागण्यासारखे भांडवल नसल्याचे यावरून दिसून येत आहे, हे मतदारांच्या मनात बिंबविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे़ उमेदवारांने त्याचे स्वत:चे फेसबुक पेज तयार केले आहे़ पदयात्रा, रोडशोमधून अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे़ राज्य पातळीवरील अनेक नेते पुण्यात प्रचाराला येत असून काही जण रोडशोमध्ये सहभागी होणार आहेत़ पुढील काही दिवसांत अनेक नेत्यांच्या जाहीर सभा होणार असून त्यातून काँग्रेसला अपेक्षित यश मिळण्यासाठी प्रयत्न केला जात आहे़