शेलगाव ग्रामपंचायतीला ‘आयएसओ’
By Admin | Updated: January 7, 2015 23:01 IST2015-01-07T23:01:17+5:302015-01-07T23:01:17+5:30
शेलगाव (ता. खेड) येथील ग्रामपंचायतीला ‘आयएसओ’ नामांकन प्राप्त झाले

शेलगाव ग्रामपंचायतीला ‘आयएसओ’
शेलपिंपळगाव : शेलगाव (ता. खेड) येथील ग्रामपंचायतीला ‘आयएसओ’ नामांकन प्राप्त झाले असून, असा बहुमान प्राप्त करणारी खेड तालुक्यातील ही तिसरी, तर तालुक्याच्या पूर्व भागातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. यामुळे शेलगावच्या वैभवात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
खेड तालुक्याच्या पूर्व भागात भीमा-भामा नदीच्या काठावर अंदाजे १,२०० लोकसंख्येचे शेलगाव हे गाव वसलेले आहे. गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांची एकी असेल तर त्याचे फळ हे निश्चित प्राप्त करता येत असल्याचे येथील ग्रामस्थांनी दाखवून दिले आहे. शेलगावला यापूर्वी त्यांच्या कामाबद्दल आदर्श गाव, सतत ३ वर्षे ग्रामस्वच्छतेचा पुरस्कार, कृषी पुरस्कार, महात्मा गांधी तंटामुक्ती पुरस्कार, हगणदरीमुक्त गाव पुरस्कार, निर्मलग्राम पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. तसेच, गावच्या करवसुलीत सतत ३ वर्षे अग्रेसर म्हणून गावाचा नावलौकिक आहे. या सर्व बाबींचा या नामांकनासाठी विचार करण्यात आलेला आहे. आयएसओ नामांकन प्राप्त झाल्यामुळे गावच्या वैभवात अधिक भर पडली असून, ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. आयएसओ नामांकन प्राप्त करण्यासाठी ग्रामपंचायतीने क्वालिटी केअर एजन्सीमार्फत कामकाज पूर्ण केले असून, गटविकास अधिकारी अजिंक्य पवार, विस्तार अधिकारी श्रीकांतदादा ढमढरे, ग्रामविकास अधिकारी विद्या बोराटे व ग्रामस्थ आदींचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
शेलगाव (ता. खेड) हे गाव भीमा-भामा नदीच्या तीरावर वसलेले आहे. ग्रामस्थांनी स्वत: श्रमदान करून गावाच्या सौंदर्यात भर टाकली आहे. वृक्षारोपणासारखा उपक्रम हाती घेऊन गावात नव्याने हजारो झाडे लावली आहेत. सौरऊर्जेवर चालणारे पथदिवे बसवून विजेचा वापर केला जात आहे.
खेड तालुक्यात यापूर्वी कान्हेवाडीतर्फे चाकण, निघोजे या ग्रामपंचायतींना आयएसओ नामांकन प्राप्त झालेले आहे. तर, यामध्ये आता शेलगावचा समावेश करण्यात आला आहे.