आयएसएमटीने काम थांबविले!
By Admin | Updated: July 13, 2015 23:57 IST2015-07-13T23:57:43+5:302015-07-13T23:57:43+5:30
मालाला उठाव नसल्याचे कारण सांगून बारामती एमआयडीसीतील आयएसएमटी कंपनीने कामकाज स्थगिती जाहीर केली आहे. याबाबत प्रवेशद्वारवरच नोटीस लावली आहे.

आयएसएमटीने काम थांबविले!
बारामती : मालाला उठाव नसल्याचे कारण सांगून बारामती एमआयडीसीतील आयएसएमटी कंपनीने कामकाज स्थगिती जाहीर केली आहे. याबाबत प्रवेशद्वारवरच नोटीस लावली आहे. कामगारांना कंपनीत प्रवेश नाकारण्यात आला आहे.
कंपनीच्या ४५४ कामगारांपैकी केवळ २६ कामगारांना कंपनीत प्रवेश देण्यात आला आहे. इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल मेंटेनन्स, एम्प्लॉई रिलेशन विभागातील हे २६ कर्मचारी आहेत. कंपनीमध्ये सिमलेस ट्यूबचे उत्पादन केले जाते़ बाजारात तीव्र स्वरूपाची स्पर्धा आहे. विशेषत: चीनमधून येणाऱ्या उत्पादनाची स्पर्धा तीव्र स्वरूपाची आहे. चीनचा माल प्रचंड प्रमाणात आयात करून साठवला जात आहे. चीनच्या मालाची विक्री किंमत या कंपनीच्या उत्पादन खर्चापेक्षा कमी आहे. त्यामुळे त्या मालाबरोबर येथील कंपनी स्पर्धा करू शकत नाही. त्याच वेळी सरकार ‘अँटी डंपिंग ड्युटी’ लावण्यासारख्या उपाययोजना करीत नाही. त्यामुळे परिस्थिती व्यवस्थापनाच्या आवाक्याबाहेर गेली आहे.
तसेच एमएसईडीसीएल या विद्युत वितरण कंपनीने कराराचा भंग केल्याने आपल्याला वीजनिर्मिती प्रकल्प बंद करावा लागला. त्याचा उत्पादन खर्चावर मोठा परिणाम झाला. या सर्व परिणामांमुळे कंपनीला उत्पादनप्रक्रिया सुरू ठेवणे आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे नमुनेदार आदेशाचे स्थायी कलम १८ प्रमाणे कामकाज स्थगिती जाहीर करण्यात येत आहे. संबंधित कामगारांना स्थायी आदेश कलम १९ प्रमाणे त्यांची रजा शिल्लक असल्यास, त्यांनी मागणी केल्यास पगारी रजा देण्यात येतील. रजा शिल्लक नसल्यास, तसेच मागणी न केल्यास हा कालावधी बिनपगारी रजा म्हणून समजण्यात येणार आहे, असे नोटिशीमध्ये नमूद करण्यात आले आहे. यावर कंपनीचे उपाध्यक्ष बलराम अग्रवाल यांची स्वाक्षरी आहे.
कंपनी व्यवस्थापनाने लावलेली नोटीस बेकायदेशीर आहे. याबाबत व्यवस्थापनाशी शांततेच्या मार्गाने चर्चा सुरू आहे. कंपनीच्या या निर्णयानंतर कामगारांना प्रवेशद्वारातच अडविण्यात आले आहे. कामगार दिवसभर उन्हात बसून आहेत. मालक बी. आर. तनेजा यांच्याशी चर्चा करण्यासाठी वेळ देण्याची मागणी करण्यात आली.
दरम्यान, या प्रकरणी कामगार आयुक्तालयात शिष्टमंडळ पाठविले आहे. आज उशिरापर्यंत व्यवस्थापनाशी चर्चा सुरूआहे, असे कामगार संघटनेचे अध्यक्ष नानासोा थोरात यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
सुधारणा झाल्यानंतर प्रकल्प पुन्हा सुरू होईल
आएसएमटी कंपनीचे उपाध्यक्ष बलराम आग्रवाल यांच्या वतीने कंपनीच्या सूत्रांनी सांगितले, की हा निर्णय नियमानुसार घेण्यात आला आहे. व्यवस्थापन कामगारांच्या हिताला बाधा येणार नाही, यासाठी दक्ष आहे. महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचा करार संपुष्टात आला आहे. याबाबत बोलणी सुरू आहेत. जेजुरी, नगर येथील प्रकल्पांतील उत्पादने वेगळी आहेत. त्या उत्पादनांना बाजारात मागणी आहे. परिस्थितीमध्ये सुधारणा झाल्यानंतर प्रकल्प पुन्हा सुरू होईल. हा निर्णय कायमस्वरूपी नाही; मात्र तो मागे घेण्याबाबत कालावधी निश्चित सांगू शकत नाही, असे कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
बोनसचा वादही न्यायालयात
बारामती शहरात २५ वर्षांपासून ही कंपनी सुरू आहे. १९९० मध्ये कल्याणी ग्रुपने या कंपनीचे बांधकाम केले. तर, प्रत्यक्षात १९९३ मध्ये उत्पादनाला सुरुवात झाली. २००० मध्ये बाबा कल्याणी यांच्याकडून बी. आर. तनेजा यांनी ही कंपनी घेतली. दिवाळीपासून कामगार आणि व्यवस्थापनामध्ये बोनस प्रश्नावरून वाद सुरू आहे. हा वाद सध्या अंतिम टप्प्यात न्यायालयात सुरू आहे. आर्थिक परिस्थितीमुळे वेतनाबाबत अनियमितता असल्याची कामगारांची तक्रार आहे.