पुणे - महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत की एका पक्षाच्या पदाधिकारी ? असा थेट सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी प्रत्यक्ष नाव न घेता महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला.मी काही त्यांचा राजीनामा वगैरे मागणार नाही, पण पक्षाच्या कार्यक्रमांना जाण्याऐवजी त्यांनी महिला अत्याचारांची दखल घ्यावी, महिलांसंबधी गुन्हे करणारे मंत्री सरकारमध्ये आहेत, त्यांच्यावर बोलावे, असेही खडसे म्हणाल्या. महिलांची सुरक्षा धोक्यात आल्याची टीका करत पक्षाच्या वतीने सरकारचा निषेध करणारे आंदोलन करण्यात आले. यावेळी खडसे उपस्थित होत्या.त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांचा निषेध केला.राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. सरकार काय करते आहे,असा प्रश्न निर्माण झाला आहे.गुन्हेगार मोकाट सुटतात,पोलिसही काही करायला तयार नाहीत.कसाबसा खटला तयार करून तो न्यायालयात जातो तर तिथे १० वर्षे १२ वर्षे निकालच लागत नाही.मंत्री गुलाबराव पाटील महिलांविषयी अनुचित बोलले, त्याचा साधा निषेधही कोणी केला नाही.मी त्यांचा निषेध करते,असेही खडसे म्हणाल्या.
दरम्यान,शहराध्यक्ष प्रशात जगताप यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी सकाळी झालेल्या आंदोलनात सरकारचा निषेध करण्यात आला. भारती शेवाळे,स्वाती पोकळे,किशोर कांबळे, अमोघ ढमाले, शेखर धावडे, पायल चव्हाण, वैशाली थोपटे व अन्य महिला कार्यकर्त्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. जगताप यांनी सांगितले की,पुण्यातील कायदा सुव्यवस्था संपूर्ण ढासळली आहे. अमली पदार्थाच्या तस्करीने शहराला विळखा घातला आहे.पोलिसांवर सरकारचा वचक नाही, असे यावेळी रोहिणी खडसे यांनी संताप व्यक्त केला.