सिंचन, वारीसाठी चार टीएमसी पाणी
By Admin | Updated: July 10, 2015 01:22 IST2015-07-10T01:22:41+5:302015-07-10T01:22:41+5:30
धरणसाखळीच्या धरणांमधील असलेल्या साडेसात टीएमसी पाणी साठ्यातील तब्बल ४ टीएमसी पाणी जिल्ह्यातील सिंचन तसेच वारीसाठी सोडण्यात येणार आहे.

सिंचन, वारीसाठी चार टीएमसी पाणी
पुणे : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीच्या धरणांमधील असलेल्या साडेसात टीएमसी पाणी साठ्यातील तब्बल ४ टीएमसी पाणी जिल्ह्यातील सिंचन तसेच वारीसाठी सोडण्यात येणार आहे. उर्वरीत पाणी शहराच्या पिण्यासाठी राखीव ठेवण्यात येणार असून हे पाणी शहरास आॅगस्ट अखेरपर्यंत पुरेल एवढे आहे.
जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पुण्यासह राज्यात जोरदार हजेरी लावलेल्या मान्सूनने गेल्या महिन्याभरापासून दडी मारली आहे. पहिलाच्य आठवड्यात झालेल्या या पावसाने शहराच्या पाणी साठ्यात तब्बल ५ टीएमसीने वाढ झाल्याने धरणातील पाणीसाठा ७.३० टीएमसीवर पोहचला आहे. पण पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची पिके ही धोक्यात आली आहेत.
पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, टेमघर, वसरगाव या धरणक्षेत्रातही पाऊस बंद आहे. जून महिन्यात काही दिवस चांगला पाऊस झाल्याने या चारीही धरणसाठ्यातील पाण्याच्या नियोजनासंदर्भात गुरुवारी महापौर दत्तात्रेय धनकवडे यांनी महापालिकेचे अधिकारी आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे धनकवडे यांनी सांगितले.
या बैठकीस नगर अभियंता प्रशांत वाघमारे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले, पाणी पुरवठा विभाग प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी उपस्थित होते. (प्रतिनिधी)