पुणे : लाडकी बहीण योजनेचा लाभ पुरुषांनी घेतल्याचे उजेडात आले आहे. घाईघाईने या योजनेचे जास्तीत जास्त अर्ज भरण्यात आले. यामागे खूप मोठे षड्यंत्र असून योजनेचे अर्ज भरून घेण्याची जबाबदारी असलेल्या आणि या योजनेसाठी सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या ठेकेदाराची ‘ईडी’, ‘सीबीआय’ व ‘एसआयटी’मार्फत चौकशी करावी, यातील जे सत्य आहे, ते महाराष्ट्रातील जनतेच्या समोर आणावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झाल्याने निवडणुकीत महायुतीला फायदा झाला. बहुमताने सरकार सत्तेवर आले. आता सरकारने योजनेसाठी आलेल्या अर्जांची छाननी सुरू केली असून, या छाननीमध्ये तब्बल १४ हजार २९८ पुरुषांनी २१.४४ कोटींचा लाभ घेतल्याचे वृत्त शनिवारी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले. या वृत्ताचा दाखला देत या योजनेचे सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या व अर्ज भरून घेण्याची जबाबदारी असलेल्या ठेकेदाराची चौकशी करण्याची मागणी सुळे यांनी शनिवारी पुण्यातील पत्रकार परिषदेत केली. त्यांनी यावेळी इतर विषयांवरही आपली मते मांडली.
मंत्री संजय शिरसाट व राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यातील वादावर बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, एकीकडे लाडकी बहीण योजना राबवायची आणि दुसरीकडे राज्यमंत्री महिलेस विरोध करायचा, ही दुटप्पी भूमिका योग्य नाही. राज्यमंत्री मिसाळ या मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने काही निर्णय घेत असतील, त्या स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतील तर इतरांनी विरोध करण्याचे कारण नाही. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी दुसरे कोणी करण्यापेक्षा त्यांनीच नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्या, अशी मागणीही यावेळी सुळे यांनी केली.
मुख्यमंत्री फडणवीस मित्रपक्षांवर नाराज
गेल्या सत्तार वर्षांत जेवढी महाराष्ट्राची बदनामी झाली नाही, तेवढी बदनामी या दीडशे दिवसांत झाली आहे. राज्य आर्थिक संकटात आहे, दररोज गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे, मंत्री वादग्रस्त विधाने करत आहेत. या सर्व गोष्टींमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मित्रपक्षांवर नाराज असून, त्यांनी आपली नाराजी दिल्लीमध्ये गृहमंत्री अमित शहा यांच्या कानावर घातल्याचा गौप्यस्फोटही सुळे यांनी केला.
निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक
पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची निवड झाल्यानंतर शहर कार्यकारिणीमध्येही बदल होण्याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुळे यांच्या उपस्थितीमध्ये शनिवारी शहरातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांची बैठक झाली. यात आगामी महापालिका निवडणुकीसाठी वॉर्ड व प्रभागाची रचना कशी असेल, काय तयारी करावी लागेल, याची चर्चा करण्यात आल्याचे सुळे यांनी सांगितले.
सुळे असेही म्हणाल्या...
- माजी मंत्री धनंजय मुंडे यांना क्लीन चिट देणे चुकीचे असून, आम्ही त्यांना निर्णयप्रक्रियेत घेऊ देणार नाही.
- महादेव मुंडेंची हत्या व वाल्मीक कराडांना मिळणारी व्हीआयपी ट्रीटमेंट, यावर आम्ही गृहमंत्री अमित शहा यांची वेळ मागितली आहे.
- शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत, याबद्दल मला माहिती नाही. मात्र, आम्ही महाराष्ट्रप्रेमी आहोत. विरोधकांच्या विकेट पडत आहेत म्हणून आम्हाला आनंद होत नाही, ते राज्यातल्या विषयांवर बोलण्यासाठी भेट घेत असावेत.
- गेली कित्येक महिने मी हिंजवडीच्या अडचणी मांडत आहे, सरकारला उशिरा शहाणपण सुचले आहे.
- हिंजवडीसंदर्भातील बैठकांना बोलावले जात नाही.
- हिंजवडीतील एका शाळेसमोर बार आहे, हा बार बंद झाला नाही तर मी स्वतः उपोषणाला बसणार आहे.
- पालकमंत्री अजित पवार यांनी कला केंद्रातील गोळीबार प्रकरणी मोक्का लावण्यासोबत कोकाटेंचा निर्णय मंगळवारी घेण्याचे बोलून दाखवले आहे, ते त्यांनी करून दाखवावे.