राहूबेटात अवैध वाळूउपसा
By Admin | Updated: February 12, 2015 23:46 IST2015-02-12T23:46:15+5:302015-02-12T23:46:15+5:30
राहूबेट (दौंड) येथील मुळा-मूठा व भीमा नदीपात्रात यंत्रसामग्रीच्या साह्याने भरदिवसा बेकायदा वाळूचा उपसा सुरू आहे. बेसुमार उपसा सुरू असल्याने त्याचा उपद्रव ग्रामस्थांना होत आहे.

राहूबेटात अवैध वाळूउपसा
राहू : राहूबेट (दौंड) येथील मुळा-मूठा व भीमा नदीपात्रात यंत्रसामग्रीच्या साह्याने भरदिवसा बेकायदा वाळूचा उपसा सुरू आहे. बेसुमार उपसा सुरू असल्याने त्याचा उपद्रव ग्रामस्थांना होत आहे.
या पसिरात कुठलाही वाळूचा लिलाव झालेला नाही, तर या लिलावासंदर्भात प्रक्रिया सुरू आहे. मात्र, काही वाळू ठेकेदार सांगतात, की आम्ही लिलाव घेतलेला आहे. त्यामुळे या ठिकाणाहून जी वाळू काढली जात आहे, ती अधिकृतपणे काढली जात आहे, असे सांगून ग्रामस्थ तसेच शासनाची फसवणूक करीत आहेत.
मुळा - मुठा नदीपात्रातील मिरवडी, दहिटणे, देवकरधार, तामखडा, टेंगलबेट, वाळकी, कोरेगाव भिवर, वडगाव बांडे, पाटेठाण, टाकळी, देलवडी यांसह १२ ठिकाणे असून त्यापैकी देलवडी, वाळकी या परिसरात अद्याप लिलाव झालेले नाहीत. तरीदेखील या ठिकाणी बेकायदेशीरपणे वाळूउपसा सुरू आहे. या ठिकाणावरील वाळूउपसा तत्काळ बंद करण्याची मागणी ग्रामस्थांमधून पुढे आली आहे.
राहू बेटातील रक्ताळलेली वाळू संपूर्ण महाराष्ट्राला चांगलीच परिचयाची असताना सध्या याच वाळूवरून पुन्हा मतभेद होऊन त्याची पुनरावृत्ती न होण्याची काळजी आता वाळू तस्करांसह महसूल यंत्रणेने घेण्याची गरज असल्याची चर्चा सर्वसामान्य व्यक्त करीत आहेत. (वार्ताहर)