आंतरराष्ट्रीय पॅराबॅडमिंटन; सुकांत कदमला २ कांस्य
By Admin | Updated: July 2, 2017 03:00 IST2017-07-02T03:00:39+5:302017-07-02T03:00:39+5:30
जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्राच्या सुकांत कदम याने थायलंड पॅराबॅडमिंटन स्पर्धेत आणि एफझेड फ्रोझा

आंतरराष्ट्रीय पॅराबॅडमिंटन; सुकांत कदमला २ कांस्य
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्राच्या सुकांत कदम याने थायलंड पॅराबॅडमिंटन स्पर्धेत आणि एफझेड फ्रोझा आयरीश पॅराबॅडमिंटन स्पर्धेत प्रत्येकी १ कांस्यपदक जिंकले.
सध्या जबरदस्त फॉर्मात असलेल्या सुकांतने मागील ५ स्पर्धांत मिळून ८ पदके पटकावली आहेत. थायलंडमधील स्पर्धेत सुकांतला जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू फ्रान्सच्या लुकास माझूर याच्याकडून उपांत्य फेरीत ७-२१, १८-२१ने पराभव स्विकारावा लागला. लुकासविरूध्दचा सुकांतचा हा दुसरा पराभव होता. याआधी स्पॅनिश पॅरा बॅडमिंटन स्पर्धेतही लुकासने त्याने नमविले होते.
डबलिन येथे झालेल्या आयरीश पॅराबॅडमिंटन स्पर्धेतही सुकांतला उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला. थायलंडच्या सिरीपाँग टेमेरॉम याने सुकांतवर २१-१९, १६-२१, २१-१६ अशा फरकाने सरशी साधली. याच स्पर्धेत मागील वर्षीही सुकांतने कांस्यपदक मिळवले होते.
या दोन्ही स्पर्धांमध्ये दुहेरी प्रकारात सुकांत हा उमेश विक्रम कुमार याच्या साथीे खेळला. पण दोन्ही स्पर्धांत उपांत्यपूर्व फेरीतच या जोडीचे आव्हान संपले. सुकांत हा निखिल कानिटकर बॅडमिंटन अकादमीत सराव करतो.
आपल्या कामगिरी बाबत बोलताना सुकांत म्हणाला की, युरोपपेक्षा आयर्लंड आणि थायलंड येथील सामने खेळणाचा अनुभव वेगळा होता. आयर्लंड येथील प्रतिस्पर्ध्यांसोबत मी पहिल्यांदाच खेळलो. या स्पर्धांमधील सहभाग मला वेगळा अनुभव देऊन गेला.