इच्छुकांनी गिरविले आॅनलाइनचे धडे

By Admin | Updated: January 24, 2017 02:50 IST2017-01-24T02:50:22+5:302017-01-24T02:50:22+5:30

आगामी महापालिका निवडणुकीसाठी आॅनलाइन अर्ज कसा भरायचा, अचूक माहिती भरण्यासाठी काय दक्षता घ्यावी, त्याची प्रिंट

Interested online lessons | इच्छुकांनी गिरविले आॅनलाइनचे धडे

इच्छुकांनी गिरविले आॅनलाइनचे धडे

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी आॅनलाइन अर्ज  कसा भरायचा, अचूक माहिती भरण्यासाठी काय दक्षता घ्यावी, त्याची प्रिंट कुठे जमा करायची, अशा अनेक शंकांचे समाधान  करून घेत इच्छुक उमेदवार, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व सायबर
कॅफेचालकांनी आॅनलाइन प्रशिक्षणाचे धडे गिरविले.
महापालिका प्रशासनाच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे सोमवारी आॅनलाइन फॉर्म भरण्याच्या
प्रक्रियेची संपूर्ण प्रक्रियेची माहिती देण्यात आली. महापालिकेच्या निवडणुकीसाठी यंदा पहिल्यांदाच आॅनलाइन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया सर्वांसाठी नवीन आहे. त्यामुळे महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून याची माहिती दिली जाणार आहे.
मुख्य निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ, आॅनलाइन संगणक प्रणाली, नामनिर्देशपत्रासोबत सादर करावयाची कागदपत्रे अपलोड करणे, निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे सादर करणे आदींची माहिती या वेळी देण्यात आली. या वेळी महापालिकेच्या निवडणूक विभागाचे प्रमुख सतीश कुलकर्णी, संगणक विभागाचे प्रमुख राहुल जगताप, सर्व क्षेत्रीय कार्यालयांचे निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.
सतीश कुलकर्णी यांनी सांगितले, ‘‘निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला आहे. या प्रशिक्षणाबरोबरच प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये इच्छुक उमेदवारांसाठी मदत कक्ष उभारला जाणार आहे. तिथे उमेदवारांना माहिती मिळू शकेल.’’
पूर्वी निवडणुकीचा फॉर्म भरताना संपत्ती, छोटे कुटुंब आदी प्रतिज्ञापत्र स्वतंत्रपणे जोडावे लागत होते. आता ही प्रतिज्ञापत्र एकत्रपणे देता येणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली. एकूण ४ फॉर्म भरावे लागणार आहेत. उमेदवारांना त्यांच्या माहितीचा संपूर्ण तपशील द्यावा लागणार आहे. या वेळी उपस्थित असलेल्या इच्छुक उमेदवारांनी अनेक शंका प्रशासनाला विचारल्या.
एखाद्या इच्छुक उमेदवाराचे पक्षामध्ये ऐनवेळी बदल झाला तर काय करायचे, आॅनलाइन फॉर्म भरताना चुका झाल्या तर फॉर्म रद्द होणार नाही ना, एकदा फॉर्म सेव्ह केल्यानंतर त्यामध्ये दुरुस्ती करायची असेल तर काय करायचे आदी शंका उपस्थितांकडून विचारण्यात आल्या.
सर्व फॉर्म भरून झाल्यानंतर त्याच्या प्रिंटआऊट काढून त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा कराव्या लागणार आहेत. आॅनलाइन प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात आले तरी संगणक, इंटरनेट याची चांगली माहिती असणाऱ्या व्यक्तीला सोबत घेऊनच अर्ज भरावा लागेल, अशी भावना या वेळी इच्छुकांकडून व्यक्त करण्यात आली.

Web Title: Interested online lessons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.